अजित पवारांनी पाळला सिन्नरकरांना दिलेला शब्द
माणिकराव कोकाटेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-16 11:52:19

मुंबई : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपुरात पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात ३९ मंत्र्यांनी पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदेंसह १२ मंत्रिपदे आलीत, तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह १० खाती मिळाली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान सिन्नर येथे आयोजित प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना आमदार करा, मी त्यांना मंत्री करतो, मंत्रिमंडळात कोकाटेंना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी सिन्नरकरांना दिले होते. आता अजित पवार यांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सोमाठाणे या छोट्या खेड्यात सामान्य शेतकरी कुटुंबात २६ सप्टेंबर १९५७ला जन्मलेले आणि कोणताही राजकीय वारसा नसलेले ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली. त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना एनएसयुआय संघटनेत प्रवेश घेऊन केली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केला. जिल्हा परिषद सभापती, सिन्नर पंचायत समिती सभापती ते आमदार असा प्रवास केला. त्यांचा राजकीय प्रवास नेहमीच संघर्षाचा राहिला आहे.
पाचव्यांदा सिन्नरचे आमदार
माणिकराव कोकाटे यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर, शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती. नंतर नारायण राणे यांच्या सोबत २००९ मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले. त्याच वर्षी सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा निवडून आले. सन २०१४ मध्ये त्यांनी भाजकडून निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. सन २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये चौथ्यांदा विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजित दादा यांच्या गटात गेले. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ४१ हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार झाले.
मतदारसंघातील प्रभावी विकासकामे
पूरचारीचे काम, पुन्हा सेझ सुरू करण्यासाठी प्रयत्न, नदीजोड प्रकल्प, सिन्नर एमआयडीसीसाठी वाढीव जमीन संपादन करून घेऊन उद्योग क्षेत्रात भरीव काम केले आहे. तसेच आदिवासी समाजातून आलेले स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणे, खेळासाठी स्टेडियम उभारणी चालू आहे. आमदार कोकाटे यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक विकास प्रकल्पांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे, रस्ते, पायाभूत सुविधा, शहरासाठी १०० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित केली, ग्रामीण पाणीपुरवठा योजना यांसारख्या अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. सातशे कोटींचा पर्यटन प्रकल्प आणि कळसूबाई रोपवे प्रकल्प यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. वारंवार पक्ष बदल होत असतानाही कोकाटे यांची अनुकूलता आणि तळागाळातील समस्यांशी जोडलेले असल्यामुळे त्यांनी मोठे योगदान दिले आहे.