नाशिक, जळगावला प्रत्येकी तीन, तर धुळ्यातून एक मंत्री

उत्तर महाराष्ट्राला मिळाली सात मंत्रिपदे

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-16 12:05:55

लोकनामा प्रतिनिधी 
नाशिक: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रविवारी उत्तर महाराष्ट्राला सात मंत्रिपदे मिळाली आहेत. नाशिक व जळगाव जिल्ह्यातून प्रत्येकी तीन, तर धुळे जिल्ह्यातून एकाला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. नंदुरबारमधील एकालाही संधी मिळाली नाही. नाशिक जिल्ह्यातून शिवसेनेचे दादा भुसे, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नरहरी झिरवाळ, ॲड. माणिकराव कोकाटे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. जळगावमधून भाजपचे गिरीश महाजन, संजय सावकारे व शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना, तर धुळ्यातून जयकुमार रावल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.  
           मंत्रिमंडळ विस्तारात यंदा उत्तर महाराष्ट्रात महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून मंत्रिपदासाठी चांगलीच स्पर्धा सुरू होती. अखेर रविवारी (दि. १५) झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सात मंत्रिपदे मिळाली. नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही, एकाही सदस्याला संधी दिली नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत नाराजीचे वातावरण बघायला मिळते. 

भाजपने पुन्हा पुसली पाने

नाशिक शहरातील तिन्ही जागांसह चांदवड-देवळा मतदारसंघ भाजपकडे आहे. निवडणुकीच्या निकालानंतर नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, देवळा-चांदवडचे आमदार डाॅ. राहुल आहेर यांची नावे चर्चेत होती. प्रत्यक्षात विस्तारावेळी भाजपने नाशिकरांवर अन्याय केल्याचे दिसते. त्यामुळे पुढील विस्तारात तरी विचार व्हावा, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.