मध्य प्रदेश पॅटर्न कॉपी करत नव्या चेहऱ्यांना संधी
महायुती सरकारमध्ये भाजपाचा फंडा
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-16 14:06:57

नागपूर :- कधी होणार? कधी होणार असे म्हणत संपूर्ण राज्याचे, राजकीय जगताचे लक्ष लागून असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर झाला. मुंबईत हा सोहळा आयोजित न करता नागपूरमध्ये तो आयोजित करण्यात आला. ना. फडणवीसांचे माहेरघर म्हणून त्यांचे ब्रॅण्डिंग करण्याची ही संधी एनकॅश करण्यात आली. मंत्रीपदावरुन नाराजीनाट्य महायुतीत सुरु होते. त्यामुळे ना.फडणवीस व भाजपाचे वरिष्ठ नेते ही तारेवरची कसरत कशी साध्य करतात हेच पाहायचे होते. जातीनिहाय वोट बँकेची गणिते जुळवायची होती. मात्र मध्य प्रदेश पॅटर्न भाजपाने महाराष्ट्रात कॉपी केला. नव्या चेहऱ्यांना संधी देत या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.
तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का देत तरुण व नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू देत ३९ जणांपैकी २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. १० दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा आधीच शपथविधी झाला होता. हे तीन आणि नवे ३९ असे एकत्रित ४२ मंत्री असलेल्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार आहेत.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, जळगाव, ठाणे, नाशिक, यवतमाळ, बीड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, लातूर, नागपूर या १९ जिल्ह्यांना संधी मिळाली आहे. तर नंदुरबार, अकोला, वाशिम.अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, पालघर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या १७ जिल्ह्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. मी विदर्भातला म्हणून विदर्भाला झुकते माप दिले, असा ठपका ना.फडणवीस यांना नको असेल.
दरम्यान, या मंत्रीमंडळात सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रिपदं मिळाली आहेत. साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत, तर एक राज्यमंत्री मिळाले आहेत. रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. ठाणे जिल्ह्याला तीन मंत्री लाभले आहेत. मुंबईला दोन कॅबिनेट मंत्री लाभले आहेत. राज्यातील १९ जिल्ह्यांना किमान एक तरी मंत्री लाभला आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांना एकही मंत्रिपद मिळालेलं नाही. या जिल्ह्यांमधून एकूण ७९ आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी बहुसंख्य आमदार हे सत्ताधारी पक्षांचे आहेत.