राज्यसभेचा प्रस्ताव आठ दिवसांपूर्वीच नाकारला

छगन भुजबळ यांनी व्यक्त केली नाराजी

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-16 14:35:42

नागपूर : महायुती सरकारचे मंत्रीमंडळ तयार करताना अनेकांची झोळी रिकामी राहणार हे आधीच स्पष्ट होते. तीनही पक्षांना मंत्रीपद देण्यासाठी काही ज्येष्ठांना केवळ आमदारकीवरच समाधान मानावे लागणार होते. झालेही तसेच. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, येवला विधानसभा मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला. यापूर्वी भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहत होते. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ यांनी नाराजी बोलून दाखवली नसती तरच नवल होते. 

नव्यांना संधी दिली जातेय, त्यासाठी ज्येष्ठांना डावलले जात आहे. मात्र मी एक सामान्य कार्यकर्ता असून डावलले काय, फेकले काय? अशा शब्दात भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.   मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले, छगन भुजबळ काही संपलेला नाही असे सांगून कधी कधी बॅनरवर जागा नसते, त्यामुळे तेथूनही दूर करण्यात आल्याचे  छगन भुजबळ म्हणाले. 

दरम्यान, भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. मात्र राज्यसभेबाबतचा प्रस्ताव आठ दिवसांपूर्वी नाकारल्याचे सांगून मी आता माझा विधानसभा आमदार पदाचा राजीनामा देऊ शकत नाही. ती येवल्यातील  मतदारांशी प्रतारणा ठरेल. विश्वासघात ठरेल. दोन वर्षानंतर विचार करु, असं त्यांना सांगितल्याचं छगन भुजबळ म्हणाले.  सात आठ दिवसांपूर्वी तुम्ही राज्यसभेवर जा असं सांगितलं. मात्र, मला काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर जायचे होतं. सातारला जी जागा दिली तेव्हा राज्यसभेवर जायचे होतं. तेव्हा ती जागा दिली नव्हती. मला त्यावेळी सांगितलं की तुम्हाला येवल्यातून लढले पाहिजे,असे सांगितलं. तुम्ही लढाईत असला तर पार्टी जोमाने पुढं जाईल असे सांगण्यात आले. माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादने  निवडून देखील आलो, आता म्हणताय, राज्यसभेवर जा. पण राज्यसभेवर ताबडतोब जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल. येवल्याच्या मतदारांचा विश्वासघात ठरेल. मला ज्यांनी जे प्रेम दिलं त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.  

नाराज भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”.