विनोद कांबळींनी स्वीकारली कपिल देव यांची ऑफर
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-16 14:56:54
मुंबई : शिवाजी पार्क येथे क्रिकेट प्रशिक्षक सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे उद््घाटन नुकतेच झाले. मात्र या समारंभानंतर हे स्मारक नाही, तर माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची बिघडलेली तब्येत, सचिनबरोबर झालेली भेट जास्त चर्चेत राहिली. विनोद कांबळी यांना व्हीलचेअरवरून उठूनही उभे न राहता आल्यामुळे सर्वांनीच त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली. त्यातच कांबळी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जास्त काळजी वाटली. मात्र माजी कर्णधार कपिल देव विनोद याच्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी कांबळी यांना आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दाखवली. विनोद जर स्वत:हून पुर्नवसनासाठी तयार असतील तर आम्ही सर्वतोपरी मदत करू, असे कपिल देव यांनी जाहीर केले. कपिल देव यांच्या या हाकेला कांबळी यांनी ओ देत पुढील उपचार व पुनर्वसनाची तयारी दाखवली आहे.
बावन्नवर्षीय कांबळी यांनी मुलाखत दिली. कपिल देव यांची ऑफर आपण स्वीकारली आहे आणि त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ‘मी रिहॅबसाठी तयार आहे. मला जायचे आहे. कारण मला कशाचीच भीती वाटत नाही. माझे कुटुंब माझ्यासोबत आहे,’ असेही ते पुढे म्हणाले.
यापूर्वी त्याच्या जवळच्या मित्राने सांगितले होते की, कांबळी १४ वेळा रिहॅबसाठी गेला होता. कांबळी यांनी पुढे बोलताना सांगितले की, त्याला युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे, त्यामुळे गेल्या महिन्यात तो बेशुद्ध झाला होता. कांबळीच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी मिळून काळजी घेत आहेत आणि आजारातून बरे होण्यास मदत करत आहेत. कांबळीने आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचा खुलासाही केला. बीसीसीआयकडून मिळणारे दरमहा ३० हजार रुपये पेन्शन हेच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे.