नाराजी दूर करण्यासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला
एकनाथ शिंदे यांची माहिती
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-16 15:41:08

नागपूर:- आधी मुख्यमंत्रिपदावरुन, नंतर गृहमंत्रीपदावरुन नंतर मंत्रीमंडळ विस्तारावरुन महायुतीत रणकंदन होणार हे स्पष्टच होते. अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्ष फोडून माणसे गोळा केली होती. त्याचा कुठेतरी लाभ सरकार स्थापनेदरम्यान व्हावा, ही या दोघांची इच्छा होती. मात्र दोघांनाही फडणवीसांच्या ताटाखालचे मांजर बनून राहण्याखेरीज पर्याय सध्या तरी नाही. त्यामुळेच जी मंत्रीपद मिळाली, ती पदरात पाडून घेणे एवढेच ते करु शकतात. पण यामुळे दोनही पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने पुन्हा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला वापरायचे ठरवले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मात्र, यानंतरही शिवसेनेतील काही दिग्गज नेते नाराज आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. तसेच आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिले तरी घेणार नाही, असे विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपाचे १९ मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे ११ मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ९ मंत्री असा समावेश आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र मंत्रिमंडळात अनेक माजी मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.