तबला मूक झाला!
Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-17 13:13:42
तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन (वय ७३) यांचे सोमवारी (दि. १६) अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात फुफ्फुसाच्या आजारामुळे निधन झाले. ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत जन्मलेले झाकिर हुसेन तबलावादक उस्ताद अल्ला रक्खा यांचे ज्येष्ठ पुत्र होत. वडिलांकडून त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. उस्ताद अल्ला रक्खा यांचा वारसा जपताना स्वतःची मेहनतरूपी साधना अर्पण करत तबला या भारतीय वाद्याला जगभरात वेगळी ओळख निर्माण करून दिली. वडिलांसोबत त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासून देशभरात तबलावादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अनेक भारतीय व परदेशी चित्रपटांना संगीत दिले. अनेक चित्रपटांत कामही केले. ‘हीट अँड डस्ट’ हा ब्रिटिश चित्रपट, तसेच ‘साज’ या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी शबाना आझमी यांच्यासोबत काम केले आहे. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. ते चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते राहिले. त्यांना पद्मश्री (१९८८), पद्मभूषण (२००२) आणि पद्मविभूषण (२०२३) यांसह भारताचे सर्वोच्च नागरी सन्मानदेखील मिळाले होते. १९८८ मध्ये त्यांना सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी ते सर्वांत तरुण पद्म पुरस्कारविजेते होते. संगीत क्षेत्रातील त्यांच्या या यशामुळे त्यांचे वडील उस्ताद अल्ला रक्खा यांनी स्वतःच्या हाताने त्यांना हार घातला होता. त्याच वेळी पं. रविशंकर यांनी झाकिर हुसेन यांना पहिल्यांदा उस्ताद म्हणून संबोधले आणि ही उपाधी आयुष्यभरासाठी त्यांना लाभली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना सात वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांनी तयार केलेल्या धीस मोमेंट या अल्बमला चार ग्रॅमी पुरस्कार मिळाले. एकाच वेळी तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांची बोटं विद्युत वेगाने तबल्याशी खेळायची. सन १९७३ मध्ये गिटारवादक जॉन मॅक्लॉफ्लिन, व्हायोलिनवादक एल. शंकर आणि तालवादक टी. एच. विनायकराम यांच्या सहकार्याने त्यांनी फ्यूजन बँड शक्तीची निर्मिती केली, जो जागतिक संगीत इतिहासातील मैलाचा दगड ठरला. अमेरिकन झांज व भारतीय तबल्याचे फ्यूजन करण्याचे श्रेय त्यांना जाते. या प्रयोगामुळेच त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. १९७५ च्या दरम्यान त्यांनी शक्ती या बँडसोबत संगीतातील आणखी प्रयोग केले. लहानपणापासूनच तबल्याचे ताल झाकिर हुसेन यांच्या कानावर पडत होते. असे सांगितले जाते की, त्यांच्या जन्मानंतर वडिलांनी त्यांना हातात घेतल्यावर त्यांच्या कानात कुराणाच्या आयत वाचल्या नाहीत, तर तबल्याचे बोल ऐकवले होते. त्यांच्या आई बीवी बेगम यांना मात्र तबलावादन आवडत नव्हते. मात्र, त्यांनी झाकिर यांना विरोध न करता त्यांची आवड ही सवय बनवली. झाकिर हुसेन यांच्या हाती एखादे भांडे पडले तरी ते त्यातून सूर काढून दाखवत असत. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद बिस्मिल्लाह खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांचा सहवास लाभला. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या अनेक दिग्गजांची साथ लाभल्यामुळे कमी वयातच ते तबल्यामधील उस्ताद बनले. १९९२ मध्ये त्यांनी मिकी हार्टसोबत प्लॅनेट ड्रम हा अल्बम तयार केला, ज्याला वर्ल्ड बेस्ट म्युझिक अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. या अल्बमचे आठ लाख रेकॉर्डस् विकले गेले होते. ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटात सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर झाकिर हुसेन यांना देण्यात आली होती. मात्र, वडिलांनी नकार दिल्याने त्यांनी ही भूमिका स्वीकारली नाही. ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी झाकिर हुसेन यांना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाउसमध्ये आमंत्रित केले होते. व्हाइट हाउसच्या कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय म्युझिशियन होत. सन १९९० च्या दशकात टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या एका जाहिरातीमुळे झाकिर हुसेन यांचे नाव अनेकांना पहिल्यांदा माहिती झाले. नव्वदीतील पिढीसाठी ही जाहिरात कधीही न विसरणारी आठवण ठरली. ताजमहालच्या बॅकड्रॉपमध्ये 'वाह उस्ताद नहीं, वाह ताज बोलिए' हे हुसेन यांचे शब्द आजही अनेकांच्या लक्षात आहेत. ब्रुक बाँड चहा १९६६ साली कोलकात्त्यात सुरू झाला. विशेष म्हणजे, महान तबलावादक या जाहिरातीसाठी पहिली चॉइस नव्हते. अभिनेत्री झीनत अमान व मालविका तिवारी यांनी या जाहिरातीत काम केले होते. पण १९८० च्या दशकात आपल्या ताजमहाल चहाची लोकप्रियता मध्यमवर्गीयांतही वाढत आहे, हे चहा निर्मात्यांच्या लक्षात आले. ताजमहाल चहाची नवी इमेज तयार करण्यासाठी हिंदुस्थान थॉमसन असोसिएट्सची मदत घेण्यात आली. त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृती यांचा मिलाफ साधणारा चेहरा हवा होता. तो त्यांना झाकिर हुसेन यांच्या रूपाने मिळाला. झाकिर यांनाही या जाहिरातीची कल्पना इतकी आवडली की, ते स्वत:च्या खर्चाने चित्रिकरणासाठी सॅन फ्रान्सिस्कोहून आग्र्याला आले होते. आजही 'ऑल टाइम ग्रेट' जाहिरातींत या जाहिरातीचा समावेश आहे. त्यानंतरच्या काळात या जाहिरातीत पॉप गायिका आलिशा चिनॉयसह अनेक चेहरे दिसले. पण उस्ताद झाकिर हुसेन यांचा चेहरा या जाहिरातीचा अविभाज्य भाग बनून राहिला. एक सर्वोत्कृष्ट तबलावादक असण्याबरोबर झाकिर हुसेन हे त्यांच्या अफाट नम्रतेसाठी प्रसिद्ध होते. साध्या-साध्या प्रश्नांना ते मिश्कीलपणे उत्तरे देत समोरच्या व्यक्तीचा गोंधळ उडवून टाकत व त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत असत. आज भारतीय तबला वाद्याचा उस्ताद काळाने आपल्यातून ओढून नेला आहे. आपल्या बोटांच्या जादुई करामतीने त्यांनी घराघरांत जो तबला पोहोचवला तो तबला आज मूक झाला आहे. संगीतक्षेत्रात विविध रेकॉर्ड रचणाऱ्या एका महान व तितक्यात विनम्र तबलावादकाला आपण मुकलो आहोत.