खासगी बस आणि ट्रकची धडक: सहा जण जागीच ठार

गुजरातमधील भावनगरमधील घटना

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-17 13:30:19

भावनगर : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात   एक खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात  ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर  १० जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  आज दि.१७ डिसेंबर रोजी  सकाळी ६ वाजेच्या सुमारास गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील तळाजा तालुक्यातील त्रापज गावाजवळ ही घटना घडली. भावनगर-तळाजा महामार्गावर भावनगरहून महुव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसने डंपर ट्रकला मागून धडक दिली. घटनेची माहिती मिळताच  पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.  जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.