अखेर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची झाली भेट
१५ ते २० मिनिटांची चर्चा; राहुल नार्वेकरांचीही भेट
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-17 16:06:06
मुंबई :- आझाद मैदान येथे झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच आमदार आदित्य ठाकरे यांना आंमत्रण देण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडीने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकत द्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्धींची ही भेट चर्चेत असून अनेक राजकीय आडाखे बांधले जात आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे.
या भेटीप्रसंगी आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर उपस्थित होते. या भेटीदरम्यान ना.फडणवीस व ठाकरे यांच्यात सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेनेला सर्वाधिक २० जागा जिंकता आल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपैकी १० टक्के जागा जिंकणे गरजेचे असते. मात्र एकाही पक्षाला २९ जागा जिंकता आलेल्या नाहीत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही ठाकरे यांनी भेट घेतली.