भारताने फॉलोऑन टाळला

बुमराह-आकाशदीपने लढवली खिंड

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-17 16:27:01

ब्रिस्बेन:-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीत  आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर भारतीय संघावर फॉलोऑन व पराभव असे दुहेरी संकट घोंघावत होते. मात्र जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप हे दोन आघाडीचे गोलंदाज भारतासाठी संकटमोचक म्हणून धावून आले. दोघांनी अत्यंत सावध व बचावात्मक खेळी करत भारताचा फॉलोऑनच्या छायेतून बाहेर काढले. 

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची ४ बाद ५१ अशी बिकट अवस्था होती. कांगारुंच्या४४५ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना भारताला नाकी नऊ आले होते. मात्र, चौथ्या दिवशी पुढे खेळताना जडेजा-केएल राहुल यांनी भारताची पडझड रोखली. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा दोघांनी अर्धशतकी खेळी केली. अवघ्या १६ धावांनी  केएल राहुलचे शतक हुकलं आणि तो १३९  चेंडूत ८ चौकारांसह ८४ धावा करून बाद झाला. केएल राहुलला जडेजाने चांगली साथ दिली. जडेजाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्य दाखवून देत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने महत्त्वपू्र्ण ७७ धावा केल्या.ही जमलेली जोडी बाद झाल्यानंतर . बुमराह-आकाशदीपने उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना सादर केला. 

दोघांनी बचावात्मक फलंदाजी करत  १० व्या विकेटसाठी आतापर्यंत ५५ चेंडूत ३९ धावांची भागीदारी रचली आहे. योग्य चेंडूंवर फटकेबाजी आणि बचावात्मक फलंदाजी करत या दोन्ही गोलंदाजांच्या फलंदाजी कौशल्याने सर्वच चाहत्यांना प्रभावित केलं. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी ६ धावांची आवश्यकता असताना आकाशदीप मोठा फटका खेळू पाहत होता. इतक्यात ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीने संदेश पाठवत खेळाडूंना जणू काही आरामात खेळण्यास सांगितले.  ४ धावांची गरज असताना आकाशदीपने जबरदस्त फटका मारत चौकार खेचला  आणि मैदानावर चाहत्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.  भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये गंभीर आणि कोहलीही जोरदार सेलिब्रेशन करताना दिसले.  

भारताने फॉलोऑन टाळल्यानंतर खराब सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा सामना तिथेच थांबवण्यात आला. चौथ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत भारताने ९ बाद २५२ धावा केल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियाकडे अजूनही १९३ धावांची आघाडी आहे. तर बुमराह १० धावा आणि आकाशदीप २७ धावांवर नाबाद आहेत.