काँग्रेसचा नवा चेहरा
Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-18 11:33:18
प्रभावी नेतृत्वाअभावी काही वर्षांपासून लोकसभेत गलितगात्र ठरलेल्या काँग्रेसला खासदार प्रियंका गांधी यांच्या रूपाने आता नवा चेहरा लाभला आहे. आपल्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखी असलेली चेहऱ्याची ठेवण, तेवढाच आत्मविश्वास व अभ्यासपूर्ण भाषण यांमुळे प्रियंका गांधी यांनी लोकसभेत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. शुक्रवारी (दि. १३) त्यांनी लोकसभेत केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात संविधान ते जातीनिहाय जनगणना, मोदी ते अदानी अशा सर्व विषयांना स्पर्श करत विरोधकांना ‘एक नारी सबपे भारी’ याचा प्रत्यय आणून दिला. त्यांच्या या भाषणावर विरोधकांनी उघड प्रतिक्रिया देणे टाळले असले, तरी प्रियंका गांधी यांनी आत्मविश्वासपूर्ण केलेले हे भाषण खऱ्या अर्थाने उत्कृष्ट ठरले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून राजीनामा दिल्यानंतर, तेथून प्रियंका गांधी यांनी पोटनिवडणूक लढवली व निवडूनही आल्या. निवडणुकीतील विजयानंतर प्रियंका गांधींच्या कामकाजाचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. संवैधानिक पदावर निवड होताच प्रियंका गांधींनी हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजवण्यास सुरुवात केली आहे. केवळ भाषणच नाही, तर आपल्या कृतीतूनदेखील त्या विरोधकांवर काही न बोलता आगपाखड करत आहेत. सोमवारी (दि. १६) त्यांनी हमास-इस्रायलमधील पॅलेस्टाईन पीडितांच्या समर्थनार्थ ‘फिलिस्तीन आजाद होगा’ असे लिहिलेली बॅग आणली होती, तर मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी संसद परिसरात त्या ‘बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या मागे उभे राहा’ असे लिहिलेली बॅग खांद्याला लटकवून आल्या होत्या. आपल्या प्रत्येक कृतीतून त्या संबंधित बारीकसारीक गोष्टींचा विचार करताना दिसत आहेत. ‘पॅलेस्टाईन’ समर्थकांसाठी त्यांनी जी बॅग आणली त्यावरील प्रत्येक चिन्ह व रंगसंगती हे फिलिस्तिनी एकजुटीचे प्रतीके दर्शविणारे होते. ‘बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या मागे उभे राहा’ असे लिहिलेल्या बॅगेवर
‘अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ।।’
हा संस्कृतमधील श्लोक लिहिलेला होता. यातून प्रियंका गांधी यांच्या सूक्ष्म नियोजनाची झलक दिसत होती. लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी संविधान, न्याय, समानता आणि एकतेच्या तत्त्वांना आकार देण्याच्या भूमिकेवर जोर देताना ही कृती प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर घटनात्मक मूल्ये नष्ट करण्याचा आणि न्याय आणि राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. नेहरूंचा धागा पकडत स्वतंत्र भारतात त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांची आठवण करून दिली. वर्तमानाबद्दल बोला. तुम्ही काय करत आहात ते देशाला सांगा. तुमची जबाबदारी काय? सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का, असा प्रश्न केला. लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असता, तर सरकारने राज्यघटना बदलण्याचे काम सुरू केले असते. आजचा राजा वेश बदलतो, पण जनतेत जाण्याची हिंमत दाखवत नाही, अशी थेट टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. प्रियंका यांच्या रूपाने काँग्रेसची लोकसभेतील प्रतिमा उजळून निघेल, असे वाटत आहे. एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. भाजपने राहुल गांधी यांची ‘पप्पू’ म्हणून जी प्रतिमा तयार केली आहे, ती प्रतिमा पुसण्याचे काम आता प्रियंका यांना पुढील पाच वर्षांत करावे लागणार आहे. यासाठी राहुल गांधी यांच्या संदर्भहीन भाषणांना त्यांना आवर घालावा लागेल. काँग्रेसला विरोध पक्ष म्हणून ज्या नेतृत्वाची कमतरता भासत होती, ती कमतरता प्रियंका गांधी या आपल्या कथनी अन् करणीतून पूर्ण करतील, असा आशेचा किरण काँग्रेसला दिसत आहे. त्यांच्या संसदेतील या पहिल्या भाषणाला भाजपलाही योग्य प्रकारे प्रत्युत्तर देता आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रियंका गांधी यांनी मांडलेले मुद्दे प्रभावीपणे खोडता आलेले नाहीत. फार वर्षांनंतर विरोधी पक्षातून विशेषतः काँग्रेसकडून कोणीतरी सांगोपांग चर्चा घडवून आणणारे भाषण केले आहे. इंदिरा गांधी यांच्या अदृश्य पाठिंब्यामुळेच बांगलादेशाची निर्मिती झाली होती. आता याचा बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात त्यांची नात प्रियंका गांधी यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. हिंदुत्वावर गप्पा मारणाऱ्या भाजपसाठी त्यांचे भाषण आणि कृती ही एक चपराकच ठरली आहे. पंतप्रधान मोदी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात हस्तक्षेप करू शकतात, तर ते बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर का गप्प आहेत? अशी चर्चा आता देशभरात रंगू लागली आहे. यावरून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आता प्रियंका यांच्याकडून सुरू आहे. भाजपच्या समाजमाध्यमातील फेक नॅरेटिव्हला प्रियंका या आता आपल्या कृतीतून उत्तर देताना दिसताहेत. त्यांच्या या नव्या अवताराची प्रसारमाध्यमांना दखल घ्यावी लागत आहे. त्यांच्या रूपाने काँग्रेसला आता संसदेच्या सभागृहात प्रभावी नेता आणि चेहरा मिळाला आहे.