२ हजारांनी केली नोंदणी अन् खरेदी फक्त २५० शेतकऱ्यांची
सोयाबीन दरात हजार रुपयांपर्यंत तफावत, खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-18 12:09:36

लोकनामा प्रतिनिधी
येवला : हमीभावामुळे सोयाबीन खरेदीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना प्रशासकीय पातळीवर मात्र खरेदीसाठी उदासीनता दिसते. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नावनोंदणी केली आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील सहा केंद्रांतून शनिवारपर्यंत अवघ्या २५० शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढविण्याची गरज आहे.
नाशिक जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी ७६ हजार २३६ हेक्टर क्षेत्र असताना एक लाख १६ हजार ५९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. निसर्गाने साथ दिल्याने यावर्षी सोयाबीनचे सरासरी उत्पन्नही चांगले निघाले. त्याचवेळी दराने मात्र दगा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी दहा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेलेला सोयाबीनचा भाव पुन्हा चार हजारांवर घसरला आहे. आजमितीला बाजार समितीसह खासगी बाजारात ३,७०० ते ४,००२ रुपये, तर सरासरी ३,९३० प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. हमीभावाच्या तुलनेत तब्बल ८०० ते १,००० रुपये कमी दर शेतकऱ्यांच्या पदरात पडत असल्याने किमान आधारभूत म्हणजेच हमीभावाच्या विक्रीला शेतकऱ्यांची पसंती आहे. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी केंद्र शासनातील नाफेड व एनसीसीएफमार्फत जिल्ह्यातील तालुका खरेदी-विक्री संघाच्या सहा केंद्रांतून नावनोंदणी करून खरेदी सुरू आहे.
यावर्षी सोयाबीनचा हमीभाव ४,८९२ रुपये असून, तो गेल्या वर्षापेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सोयाबीन विक्रीसाठी १,९३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यांतील २५० शेतकऱ्यांकडून आतापर्यंत २,७७५ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. त्यामुळे वेटिंगला असलेल्या शेतकऱ्यांचा नंबर केव्हा येणार आणि त्यांची सोयाबीन केव्हा खरेदी होणार हा प्रश्नच आहे. सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नाव नोंदणी करावी लागते. यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती. अद्याप अनेक शेतकऱ्यांची नाव नोंदणी बाकी असल्याने मुदतवाढीची मागणी होत होती. यापार्श्वभूमीवर दि. ३१ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. खरेदीची मुदत १५ जानेवारी असून, तोपर्यंत नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी होऊ शकणार नसल्याने आता खरेदीला मुदतवाढ मिळावी आणि वेग वाढवावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
खरेदीत येवला आघाडीवर
हमीभावाचा लाभ घेत येवला तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी तालुका खरेदी विक्री संघात सोयाबीन विक्री केली आहे. येथे तब्बल ६४० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे. आत्तापर्यंत १२७ शेतकऱ्यांची १,७४३ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील सहा केंद्रांपैकी निम्मी खरेदी एकट्या येवल्यात झाली आहेत.
जास्तीत जास्त खरेदी करणार
हमीभावाने तालुका खरेदी-विक्री संघात सोयाबीन खरेदी सुरू असून, सर्वाधिक खरेदी येवल्यात झाली आहे. येथे खरेदीचा वेग चांगला आहे, तर शेतकऱ्यांकडून अजूनही नाव नोंदणी सुरूच आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. मुदतीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीसाठी आमचा प्रयत्न आहे.
- बाबा जाधव, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ, येवला
जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचे आकडे
केंद्र -नोंदणी-खरेदी क्विंटल
येवला -६४० - १७४३
चांदवड- ३७१- ३३७
लासलगाव -२८६ -६३७
सिन्नर- ३२२ -५८
विंचूर -३१४ -००
देवळा -५- ००