आर.अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

पत्रकार परिषदेत केली घोषणा

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-18 12:49:59

ब्रिस्बेन:- भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी  फिरकीपटू आर.अश्विन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने अचानक जाहीर केलेल्या या निवृत्तीमुळे क्रिकेट जगतातून आश्चर्य व्यक्त होत आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने  पत्रकार परिषद घेत निवृत्तीची घोषणा केली.   

 भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल असे म्हणत अश्विनने निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. या दौऱ्यात त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. ॲडलेडनंतर तो गाबा कसोटीच्या  अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीतून बाहेर झाला होता. गाबा कसोटी दरम्यान  अश्विनने मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली. 

 आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मी क्लब-क्रिकेट खेळत राहिन. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल, मी रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांबरोबरच्या  खूप  छान आठवणी आहेत, त्या विसरणे अशक्य आहे, असल्याचे अश्विन म्हणाला.  खूप जणांचे आभार मानायचे आहेत. बीसीसीआय आणि बाकीच्या सहकाऱ्यांचे आभार तर मानेनच  पण   रोहित, विराट, अजिंक्य आणि पुजारा यांचे तर विशेष आभार कारण  हे सर्व झेल स्लिपमध्ये त्यांनी घेतले आणि  माझ्या नावावर बळींची संख्या वाढत गेली, असे भावूक झालेल्या अश्विनने पुढे सांगितले. 

आर .अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात ५३७  बळी घेतले आहेत.   ३७ वेळेस ५  बळी टिपण्याची किमया देखील त्याने केली आहे. तसेच ८ वेळा सामन्यात १० बळी पटकावले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १५६ बळी आहेत. तर टी-२० सामन्यांमध्ये ७२ बळी त्याने घेतले आहेत. सर्व फॉरमॅट मिळून त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७६५ बळी आहेत.  फलंदाज म्हणूनही अश्विन अनेकदा संघाच्या मदतीला धावून आला आहे.  कसोटी क्रिकेटमधील  ६ शतकांसह ३५०३ धावा त्याने केल्या आहेत आहेत आणि  प्रथम श्रेणीत   ८ शतके झळकावली आहेत.