विधिमंडळ सभागृहाबाहेर नौटंकी नको

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-18 14:32:17

नागपूर :- शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत यश मिळाले. ते हुरळून गेले. विधानसभाही आपलीच आता या भ्रमात ते राहिले. मात्र तसे झाले नाही. आता विधानसभा निवडणूक निकालानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्यात अमूलाग्र बदल दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट ठाकरे यांनी घेतली, हे चांगलेच आहे. मात्र आता विरोधी पक्षच उरला नसल्याने याला भेट, त्याला भेट, नंतर घरी थेट अशीच त्यांची अवस्था झाली असल्याची खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  

           देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी विधिमंडळ सभागृहाबाहेरही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावर देखील एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला. ठाकरे यांची ही नौटंकी होती, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.    “विधिमंडळाचं सभागृह हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. सभागृहाबाहेर नौटंकी करण्यासाठी नव्हे. तिथे पायऱ्यांवर बसून नौटंकी केली जाते. यातच त्यांना समाधान वाटतं. मात्र ते करण्याऐवजी त्यांनी सभागृहात येऊन लोकांचे प्रश्न मांडावे. असे शिंदे यांनी ठाकरे यांना सुनावले. 

          सगळे विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटतात. मुख्यमंत्री देखील प्रत्येकाला भेट देतात. हे चित्र पाहिलं की काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे, देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारे, सत्ता आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे, सरकार आल्यावर तुम्हाला तुरुंगात टाकू असं म्हणणारे २०१९-२० मध्ये त्यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविरोधात कटकारस्थान करणारे, कारस्थान रचून आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे आता काय करतायत ते बघा, अशी टोमणेबाजी करायला एकनाथ शिंदे विसरले नाहीत.