काळी बाजू समोर आली म्हणून काँग्रेसची नाटके सुरु
अमित शहांच्या समर्थनार्थ धावले मोदी
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-18 15:58:12
नवी दिल्ली :- संसदेतील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली असल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केेले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे दिल्लीत संसदेत तर राज्यात विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कामकाज तहकूब करण्याचीही वेळ ओढवली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्या समर्थनार्थ दंड थोपटत काँग्रेसवर हल्लाबोल केला.
भ्रष्ट काँग्रेसनेच यापूर्वी डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटिल गोष्टी केल्या. एकदा नसून दोनदा बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करणे, पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांविरोधात प्रचार करणे आणि त्यांचा पराभव मोठा मुद्दा करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ नाकारणे, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट लावण्यास नकार देणे या गोष्टींचा काँग्रेसनं डॉ. आंबेडकरांचा अवमान केलेल्या गोष्टींच्या यादीत समावेश होतो, असे मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आता काँग्रेस बाबासाहेबांचे समर्थन करत असेल तर त्याचा उपयोग नाही. कारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींविरोधातील भीषण हत्याकांड त्यांच्याच काळात झाले आहेत. हातात सत्ता असूनही त्यांनी एससी-एसटी समुदायाच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. अमित शहा यांनी काँग्रेसची हीच काळी बाजू उजेडात आणण्याचा प्रयत्न केला म्हणून ही नाटके त्यांना सुचताहेत असा सणसणीत टोला त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसला लगावला आहे.