'पुरेशा झोपेसाठी आणि मुलासाठी घेतोय ब्रेक'
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-18 16:20:52

कोणताही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये स्वत:च्या हिमतीवर, स्वत:च्या मेहनतीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे विक्रांत मेस्सी. 'साबरमती रिपोर्ट'च्या प्रदर्शनानंतर अचानक त्याने त्याच्या निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आत्ता तर कुठे चांगले सिनेमे मिळत होते आणि रिटायरमेंट काय? असे सगळे म्हणत होते. पण आता विक्रांतने स्वत:च आपण रिटायरमेंट नाही, तर काही काळासाठी ब्रेक घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. मी मध्यंतरी त्या पोस्टमध्ये बरंच इंग्रजी लिहिले होते आणि त्याचे अनेक अर्थ लावले गेले, अनेकांचा गैरसमज झाला. म्हणूनच मी आता पुन्हा स्पष्टीकरण देतोय, की मी रिटायर होत नाही. मी स्वतःला आणखी उत्तम बनवण्यासाठी खूप गरजेचा ब्रेक घेत आहे, असे विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विक्रांतने पुढे म्हटले आहे, की पत्नी शीतल ठाकूरशी चर्चा केल्यानंतरच मी हा निर्णय घेतला आहे. त्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, गेली काही वर्षे खरोखरच छान गेली आहेत. मी गेल्या वर्षांसाठी सर्वांचा आभारी आहे. मी जे मागितलं होतं, त्यापेक्षा खूप जास्त मिळालं. मी गेली २१ वर्षे काम करत आहे, पण '12th Fail' नंतर खूप छान वाटलं. फक्त संदर्भात गोष्टी मांडण्यासाठी, मी ती पोस्ट मध्यरात्री केली कारण मला झोप येत नव्हती. दरम्यान, मला दिग्दर्शन आणि निर्मितीतही काम करायचे, असे सांगून सध्या मला माझ्या मुलाला मोठं होताना पाहायचंय, अजून लिहायचंय आणि माझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. मी बऱ्याच वर्षांपासून चार-पाच तासांपेक्षा जास्त झोपलो नाही आणि मला हे सुधारण्याची गरज आहे. म्हणूनच हा ब्रेक घेत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.