जिल्ह्यात अपार आयडीचे जलद पद्धतीने कामकाज
अंतिम टप्पा, आतापर्यंत ७८.३३ टक्के काम पूर्ण
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-18 16:24:33

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून वन नेशन- वन स्टुडंट आयडी तयार केले जाणार आहेत. या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार (ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री) आयडी काढण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या अपार आयडीचे काम नाशिक जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आले असून, ७८.३३ टक्के काम झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात पाच हजार ५८० शाळांमधील १२ लाख ७१ हजार ४९० विद्यार्थ्यांपैकी नऊ लाख ९५ हजार ९७२ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित अपार आयडी नोंदविण्याचे काम जलद गतीने करण्याचे काम सुरू आहे. हा आयडी निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी ही माहिती ऑनलाइन पाहता येईल. दरम्यान, एक महिन्याच्या कालावधीत बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार युद्धपातळीवर कार्य सुरू आहे. लवकरच ते पूर्ण करण्यात येणार आहे.
ओळखपत्राचा उद्देश
भारताच्या शिक्षण प्रणालीत बदल होऊन दर्जेदार विद्यार्थी घडले जावेत, यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले जाईल. आधारकार्डप्रमाणे असणाऱ्या या ओळखपत्रात १२ अंकी नंबर राहील. या ओळखपत्रामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळतील. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शैक्षणिक प्रक्रिया सुलभ करणे, विद्यार्थ्यांची माहिती उत्तमरीत्या जतन करून त्यांचे व्यवस्थापन करणे आणि विद्यार्थ्यांना अधिक कार्यक्षम करणे, वैयक्तिक व पारदर्शक शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करणे, हा ओळखपत्र तयार करण्यामागे उद्देश आहे.
चांदवड तालुक्यात सर्वाधिक नोंदणी
अपार आयडी तयार करण्यात चांदवड तालुका प्रथम क्रमांकावर आहे. या तालुक्यात ९०.८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक महापालिका क्षेत्र भाग-१ असून, ८४.४६ टक्के कामकाज झाले आहे. तिसऱ्या स्थानी त्र्यंबकेश्वर तालुका- ८३.४६, चौथ्या स्थानी निफाड- ८२.७९, पाचवा कळवण- ८२.१५, त्याखालोखाल सुरगाणा- ८१.३६, मालेगाव महापालिका क्षेत्र- ८१.५१, नाशिक महापालिका क्षेत्र भाग-२ ७८.५२, बागलाण- ७८.४८, नाशिक ग्रामीण- ७८.१७, पेठ- ७७.७८, दिंडोरी- ७६.६३, इगतपुरी- ७६.१६, नांदगाव- ६९.९७, देवळा- ६९.५०, येवला- ७६.९८. सर्वांत शेवटी मालेगाव तालुक्याचा ग्रामीण भाग असून, तेथे फक्त ६६.९० टक्के अपार आयडी पूर्ण करण्यात आले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग युद्धपातळीवर कामकाज करत आहे.