वाढत्या थंडीचा काही पिकांना लाभ
निफाडला नीचांकी तापमान, शेकोट्यांभोवती गप्पांचे फड
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-18 16:28:17

लोकनामा प्रतिनिधी
खेडलेझुंगे : ग्रामीण भागात थंडीचा कडका वाढला आहे. महावितरण कंपनीच्या वेळापत्रकाप्रमाणे रात्रीच्या वेळी लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कडाक्याच्या थंडीचा विचार न करता शेतकरी जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देत आहेत. यावेळी शेकोटीचा आधार घेण्यात येत असल्याचे दिसत आहे.
निफाड तालुक्यात ६.१ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील हे सर्वांत नीचांकी तापमान आहे. उत्तर भारतात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे किमान तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे, तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातही सरासरीपेक्षा किमान तापमानामध्ये घट नोंदली गेल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात नीचांकी तापमानाची नोंद पुन्हा नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ६.१ अंश सेल्सिअसइतकी झाली आहे. नाशिकमध्ये १०.६, मालेगाव- १०.४, जळगाव- ७.९, अहिल्यानगर येथे ६.४ अंशसेल्सिअसपर्यंत पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीने सर्वांना हुडहुडी भरली आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातही सरासरीच्या किमान तापमानामध्ये घट झाली आहे.
आगामी तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. वातावरणातील बोचऱ्या वाऱ्यांमुळे दिवसाही थंडी जाणवते, तर सायंकाळनंतर थंडीच्या कडाक्यात वाढ होत आहे. यामुळे ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. ही थंडी गहू, हरभरा या पिकांसाठी फायदेशीर आहे. मात्र द्राक्ष पिकासाठी नुकसानकारक ठरणार आहे. गुरुवारनंतर तीन दिवस ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.
लाटसदृश स्थिती कायम
मध्य भारतात समुद्रसपाटीपासून दीड किमी उंचीपर्यंत आता छत्तीसगडमधील भिलाईच्या आसपास केंद्रबिंदू स्थित, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रत्यावर्ती (घुसळल्यासारखे मध्य बिंदूपासून बाहेर फेकणारे) चक्रीय थंड वाऱ्यांच्या परिणामातून उत्तर भारतातील थंडीचा ओघ महाराष्ट्राकडे येत असून, महाराष्ट्रात थंडीची लाट, तर काही ठिकाणी थंडीच्या लाटसदृश स्थिती कायम आहे.
- माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ