साधुग्रामसाठी शंभर एकर जागा संपादित करावी

विभागीय आयुक्तांची प्रशासनाला सूचना

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-18 16:31:59

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील शंभर एकर जागेसह वाढीव शंभर एकर जागा संपादित करण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. संपादित जागा कुंभमेळा आटोपल्यानंतर पुढील अकरा वर्षे कशा पद्धतीने वापरायची आणि त्यातून महापालिकेला उत्पन्न कसे मिळेल, यादृष्टीने सर्व विभागांनी कल्पना मांडण्याची सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.
           जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. १७) सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदी उपस्थित होते. 
          एकाच वेळी सर्व विभागांचा आढावा घेण्याऐवजी एका विभागाचा सूक्ष्मपणे आढावा घेऊन त्यांना पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आढावा बैठकीत विशेषत: आखाड्यांसाठी साधुग्रामची जागा अधिग्रहित करणे, पार्किंगची व्यवस्था, शहरातील सीसीटीव्ही, रस्त्यांबाबत चर्चा झाली. कुंभमेळ्यासाठी तपोवनातत शंभर एकर जागा महापालिकेकडे आहे. त्यापैकी किती संपादित झाली आणि उर्वरित जागा संपादित करण्यासाठी काय अडचणी आहेत, याची माहिती जाणून घेतली. कुंभमेळ्यास वाढीव शंभर एकर जागा संपादित केल्यास उर्वरित अकरा वर्षे या जागेतून महापालिकेला उत्पन्न कशातून मिळेल, याची कल्पना सुचविण्याचे आदेश त्यांनी दिले. वाढीव जागा ही मानूरच्या दिशेने घेण्याचा विचार सुरू आहे.
शहरालगत २१ ठिकाणी पार्किंग
       कुंभमेळ्याच्या कालावधीत पर्वणीच्या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यासाठी शहरात येणार्‍या मुख्य रस्त्यांवर २१ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. सन २०१५च्या कुंभमेळ्याच्या वेळी निश्‍चित केलेल्या ठिकाणांची प्राथमिक माहिती घेण्यात आली. यात पेठ रोड, गंगापूर रोड-खंबाळे, राजूर बहुला, शिलापूर, मोह शिवार, दिंडोरी रोड, पेठ रोड मार्केट यार्ड, सातपूर, महामार्ग बसस्थानक, निलगिरी बाग, पंचवटी स्टेडियम व सिन्नर फाटा येथील पार्किंग जागांचा समावेश आहे.