जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले
४७ पैकी अवघ्या १३ जणांवर गुन्हे
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-18 16:39:57

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथे बोगस डॉक्टर आढळल्यानंतर जिल्ह्यासह राज्याची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मागील वर्षभरापासून जिल्ह्यात विविध भागांत ४७ बोगस डॉक्टर आढळल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यात सुरगाणा, इगतपुरी या आदिवासी तालुक्यांत सर्वाधिक नोंद आहे. त्यातील केवळ १३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर ३४ डॉक्टरांबाबत आरोग्य विभागाने नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात संभाजीनगर जिल्ह्यात पैठण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुद्दा चांगलाच गाजला होता.
मागील वर्षी बोगस डॉक्टरांची संख्या ३२ होती. त्यात यंदा वाढ झाल्याने ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी आपला मोर्चा वळविला आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समिती तयार करण्यात आली. परंतु समितीने कोणतेही ठोस असे कार्य केले नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाकडूनही तक्रारी नसल्याचे कारण देत या बोगस डॉक्टरांकडे एक प्रकारे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. यातूनच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही अनेक डॉक्टर कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना सर्रास रुग्णांवर उपचार करत आहेत. अशा बोगस डॉक्टारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे, अन्यथा निरपराधाचा जीव जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही सर्व तालुक्यातील समित्यांचा आढावा घ्यावा, अशी ही मागणी केली जात आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रात्री- अपरात्री किंवा सामान्य रुग्णांना त्यांच्याकडून उपचार मिळण्यात अडचण होते. गावातच राहून सेवा देणाऱ्या दवाखान्याची आवश्यकता प्राप्त परिस्थितीत असते. मात्र, वैद्यकीय पदवी असलेले प्रशिक्षित डॉक्टर लहानशा खेड्यात सेवा देण्यास राजी होत नसल्याने गावागावांत बोगस डॉक्टरांची संख्या वाढत असून, लोकांच्या आरोग्याशी हा एक प्रकारे खेळ सुरू आहे.
सुरगाणा टॉपवर
सुरगाणा : १९, इगतपुरी : १२, नांदगाव : ४, कळवण : १, , पेठ : १, बागलाण : ३, सिन्नर : २, मालेगाव : ४, येवला : १.