जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात पाच दहशतवादी ठार
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झाली चकमक
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-19 12:17:01

कुलगाम:- जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कदेर येथे संशयित दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोध आणि नाकाबंदी मोहिम सुरू केली.
लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर १९ डिसेंबर रोजी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी कुलगाममध्ये कादेर येथे संयुक्त मोहिम सुरू केली. या भागात संशयित हालचाली दिसून आल्या, यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलानेही गोळीबार केला. याच महिन्यात यापूर्वी लष्कर-ए-तैयबाशी संबंधीत दहशतवादी जम्मू आणि काश्मीरच्या दाचीग्राम भागात झालेल्या चकमकीत ठार झाला होता. हा दहशतवादी जुनैद अहमद भट गगनगीर, गांदरबल आणि इतर ठिकाणी सामान्य नागरिकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हत्येत सहभागी होता.
गेल्या महिन्यात नुकतेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्पेशल टास्क फोर्स ऑफ द नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या देशाच्या दहशतवाद विरोधी गटाला जम्मूमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले होते.