ओमानने थांबवली भारतातून अंड्यांची आयात

पोल्ट्री व्यवसायाला फटका, तामिळनाडूतील अंड्यांना होती मागणी

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-19 12:29:33

नवी दिल्ली : ओमानने भारतातून अंडी आयात करण्याचे थांबवले आहे. या घटनेमुळे तामिळनाडू येथील नमक्कलमधील पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे. येथील टेबल अंडी चांगल्या दर्जासाठी जगप्रसिद्ध आहेत. मात्र, ओमानने अंड्यांसाठी नवीन आयात परवाने देणे थांबवल्याने येथील व्यावसायिक अडचणीत आले आहेत.         

 द्रमुकचे खासदार के.आर.एन. राजेश कुमार यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. भारतातून अंड्यांची आयात पुन्हा सुरू करण्यासाठी ओमान व कतारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली. नमक्कल येथील अंडी निर्यातदार आणि पशुधन व शेतकरी व्यापार महासंघाचे सरचिटणीस पी. व्ही. सेंथील म्हणाले की, या निर्बंधांमुळे किमान १५ कोटींच्या भारतीय अंड्यांचे अनेक कंटेनर ओमानच्या सोहर बंदरावर असून, ते उतरवण्यात आलेले नाहीत. यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नमक्कलच्या निर्यातदारांच्या मते, ओमान व कतार या दोन प्रमुख आयातदार देशांमुळे भारतातील अंडी निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.          

 ओमानने भारतीय टेबल अंड्यांसाठी आयात परवाने देणे बंद केल्यापासून नमक्कल अंडी निर्यातदारांना जूनपासून आर्थिक फटका बसला आहे. कॉन्सुलर स्तरावर अनेक बैठकांनंतर ओमानने सप्टेंबरमध्ये आयात पुन्हा सुरू केली होती. मात्र, काही मर्यादित उत्पादकांना आयातीच्या परवानग्या देण्यात आल्या. मात्र, मंगळवारी ओमानने पुन्हा भारतीय अंड्यांसाठी नवीन आयात परवाने देणे बंद करण्याचा निर्णय घेतला.नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी (NECC) कडील माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला ओमान, कतार, दुबई, अबू धाबी, मस्कत, मालदीव व श्रीलंका यांसह विविध देशांत ११४ दशलक्ष अंडी निर्यात केली होती. त्यांपैकी ५० टक्के अंडी ही ओमानमध्ये निर्यात करण्यात आली होती. मात्र, जूनमध्ये या आकडेवारीत घट होऊन तो केवळ २.६ कोटींवर आला.

नमक्कलच्या अंड्यांना मागणी का?

नमक्कल अंडी भारतात खूप प्रसिद्ध आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे या अंड्यांची निर्यात वाढली. रशिया-युक्रेन युद्धानंतर आखाती देश तुर्कीकडून अंड्यांची आयात करत होते. अशा परिस्थितीत नमक्कलच्या अंडी उत्पादकांना मोठी संधी मिळाली. कारण येथील अंडी तुर्कीच्या तुलनेत स्वस्त आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दुबई, कतार व ओमानसारखे देश नमक्कल अंडी आयात करत होते. मात्र, हे परवाने आता थांबवण्यात आल्याने येथील व्यावसायिक अडचणीत आले आहेत.