संघात होणारा अपमान निवृत्तीचे कारण असावे

अश्विनच्या वडिलांचे मोठे वक्तव्य

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-19 15:08:19

ब्रिस्बेन:- भारताचा सर्वात यशस्वी फिरकीपटू आर.अश्विन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून चर्चा सुरु आहे. बॉर्डर -गावसकर ट्रॉफीतील दोन सामने बाकी असताना अश्विनने हा निर्णय का घेतला ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र अश्विनच्या निवृत्तीबाबत त्याच्या वडिलांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय संघात अश्विनचा वारंवार अपमान होत होता, मला हे माहित होते. कदाचित हेच त्याच्या निवृत्तीचे प्रमुख कारण असावे असे त्यांनी म्हटले आहे.  दरम्यान, अश्विनने निवृत्तीनंतर   मायदेशी परतला असून त्याचे चेन्नईमध्ये राहत्या घरी जंगी स्वागत करण्यात आलं. अश्विन येताच त्याच्या वडिलांनी त्याला मिठी मारली तर आईला अश्रू अनावर झाले होते.

 अश्विनचे ​​वडील निवृत्तीबाबत बोलताना म्हणाले, “मलाही शेवटच्या क्षणी निवृत्तीची माहिती मिळाली. त्याच्या मनात काय चालले होते मला माहित नाही. त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. मीही त्याचा हा निर्णय स्वीकारला, पण त्याने ज्या प्रकारे निवृत्ती घेतली त्यावर मी आनंदी आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, कारण त्याने अजून खेळत राहायला हवे होते. निवृत्ती घेणं हा अश्विनचा निर्णय होता आणि मी त्यात हस्तक्षेप करणार नाही, पण त्याने ज्या पद्धतीने निवृत्ती घेतली त्यामागे अनेक कारणं असू शकतात. ते फक्त अश्विनलाच माहित आहे, अपमान हे यामागे एक कारण असण्याची शक्यता आहे. अश्विनची निवृत्ती हा आमच्यासाठी भावनिक क्षण आहे कारण तो १४-१५ वर्षे खेळला आणि त्याच्या अचानक निवृत्ती घेतली.  पण तो निवृत्ती घेईल अशी अपेक्षा आम्हाला होतीच कारण त्याचा सातत्याने अपमान होत होता. तो अजून किती दिवस हे सर्व सहन करू शकणार होता?, म्हणूनच अश्विनने स्वत: निवृत्तीचा निर्णय घेतला.” 

दरम्यान अश्विननेही त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामागील नेमके कारण काय आहे हे सांगितले नाही. विशेष म्हणजे, भारताचा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी सांगितले की, अश्विनच्या मनात बऱ्याच काळापासून निवृत्ती घेण्याचा निर्णय होता.

मायदेशात जंगी स्वागत

चेन्नई विमानतळावर  अश्विनच्या स्वागतासाठी  चाहत्यांनी गर्दी केली होती . यावेळी विमानतळावर त्याची पत्नी आणि दोन मुलीही उपस्थित होत्या. हे व्हिडिओ व्हायरल झाले आहे.   यानंतर अश्विनच्या चेन्नईमधील घराजवळ देखीलअश्विनच्या स्वागतासाठी त्याच्या घरी विशेष तयारी करण्यात आली होती. सोसायटीतील लोक, आई-वडील, मित्रपरिवार आधीच वाट पाहत होते. अश्विनला हार घालत, वाजत गाजत त्याच्या राहत्या घरी त्याचं स्वागत करण्यात आलं. चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने त्याच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.