ज्यांना काही लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात....
फडणवीसांची पवारांना खुसखुशीत कोपरखळी
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-19 15:49:06
नागपूर :- महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप नेहमीचेच ठरले आहेत. मनसोक्त बोलण्याची तसेच हलक्या-फुलक्या वातावरणात एकमेकांना काढलेल्या कोपरखळ्या आणि खोचक विधानांची संधी कोणालाच सोडायची नसते. सध्या विधिमंडळ सभागृहात हेच चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात कोपरखळ्यांनी सभागृह गाजवले. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही मिश्किल चिमटे काढले.
फडणवीस यांनी राज्यातील जनता आणि महायुतीतील घटकपक्षांचे आभार मानले. यानंतर सत्तापदांवरील सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. आणि नंतर त्यांनी फ्री स्टाईल भाषणबाजी सुरु केली. अजित पवारांचा उल्लेख करताना त्यांनी उपरोधिक मिश्किल शेरेबाजी केली. ती ऐकताच सभागृहात हशा पिकला. फडणवीस म्हणाले, “या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री.. दादा, ज्यांना काही लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा.. असे आमचे अजित पवार आणि आमच्यासोबतच्या घटकपक्षांनी एकत्रपणे दिलेल्या सहकाऱ्यामुळे हा मोठा विजय आम्हाला मिळाला”, असा खुसखुशीत उपमा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अजित पवारांना दिली.
भाषणाला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधी बाकांवरून भाषणं झालेल्या काही सदस्यांची नावं घेतली. त्यावेळी समोरून नाना पटोलेंनी ‘मी राहिलो’ अशा आशयाची मिश्किल टिप्पणी केली. त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही चिमटा काढत “तुम्ही सगळ्यात शेवटी बोललात”, असं म्हणत नाना पटोलेंचा उल्लेख केला. पण तसं झालं नसल्याबाबत समोरून उत्तर आल्यानंतर “अच्छा.. ठीक आहे.. राहू द्या आता.. आता उत्तर सुरू झालं. तुम्ही पुरवण्यांवर बोला.. किंवा नाना तुम्ही माझ्या कानात सांगा, मी त्याचं उत्तर देतो”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणताच विरोधी बाकांवरील सदस्यांनीही त्यांना हसून दाद दिली.