‘ विरुष्का ’ कायमचे लंडनवासी होणार
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-20 12:19:39
मुंबई :- बॅडपॅचमुळे ऑस्ट्रेलियासारख्या महत्वाच्या दौऱ्यावर भारताचे रनमशीन थंड पडले आहे. ज्यावेळी भारताला सगळ्यात जास्त गरज होती अशा वेळी विराटच्या बॅटीतून धावा येईनाशा झाल्या आहेत. त्यामुळेच सोशल मिडियावर चाहत्यांनी त्याला निवृत्तीचे सल्ले दिले आहेत. आणि कदाचित याबाबत गांभार्याने विचार करुही शकतो. तसे संकेत विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिले. एका मुलाखतीत शर्मा यांनी सांगितले, की निवृत्तीनंतर विराट कुटुंबासह कायमचा लंडनमध्ये स्थायिक होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून व वर्षांपासून अनुष्का दोन मुलांसह ( वामिका व अकाय ) लंडनमध्येच वास्तव्य करुन आहे. विराटचे सामने संपले की तो लगेचच लंडनला रवाना होतो. त्यामुळे विराटची निवृत्ती व त्याचे लंडनवासी होणे आता जवळपास निश्चित झाले आहे.
राजकुमार शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “होय, विराट पत्नी अनुष्का आणि मुलांसह लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. तो लवकरच भारत सोडून तिथे स्थायिक होणार आहे. सध्या, क्रिकेटच्या जबाबदाऱ्यांबरोबरच तो आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत आहे.” दरम्यान, विराट आणि त्याचे कुटुंब या वर्षात बहुतांश काळ लंडनमध्ये राहिले. आपल्या मुलाच्या जन्मानंतर, कोहली जूनमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात परतला. मात्र, जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर कोहली पुन्हा लंडनला परतला आणि ऑगस्टपर्यंत तिथेच राहिला. लंडनमध्ये राहण्यामागचे कारण म्हणजे विराट आणि त्याच्या कुटुंबाला तिथे एकांतात वेळ घालवता येतो, असं त्याने एकदा सांगितले आहे.