दिल्लीत ६० वर्षांवरील वृद्धांवर होणार मोफत उपचार
केजरीवाल यांची संजीवनी योजनेची घोषणा
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-20 12:39:07

नवी दिल्ली :- महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर आता देशाचे लक्ष दिल्ली विधानसभा निवडणूकांकडे लागले आहे. कारण महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाजपाची मोहीम महाराष्ट्रात बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. तीच मोहीम दिल्लीत राबवत त्यांना ‘ आप ‘ चे काम तमाम करायचे आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा धोका वेळीच ओळखून त्यादृष्टीने विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. विविध योजनांची घोषणा ते सध्या करताना दिसताहेत. आता त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. संजीवनी योजनेंतर्गत ( बुजुर्गो का सम्मान ) दिल्लीतील ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांवर दिल्लीतील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. अरविंद केजरीवाल यांनी एका जाहीर सभेत ही घोषणा केली आहे.
या योजनेची घोषणा करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, वडिलांनीच कुटुंबाला चांगले शिक्षण दिले, प्रत्येकासाठी खस्ता खाल्ल्या आणि मुला-बाळांना त्यांच्या पायावर उभे केले. परंतु अनेक वेळा रुग्णालयांमध्ये उपचाराअभावी वृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. बऱ्याचवेळी अनेकजण वृद्धांवर उपचार घेण्यास टाळाटाळ करतात कारण त्यावर भरपूर पैसा खर्च होतो. पण आता वृद्धांना मोफत उपचार देणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.
या योजनेंतर्गत ६० वर्षांवरील वृद्धांवर दिल्लीतील सर्व सरकारी आणि गैर-सरकारी रुग्णालयात मोफत उपचार केले जातील. या योजनेअंतर्गत कोणत्याही वृद्धांना मोफत उपचार मिळणार आहेत. यात ना श्रीमंत दिसतो ना गरीब, ना कुठली मर्यादा. विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल एकामागून एक योजनांची घोषणा करत आहेत. याआधीही त्यांनी ऑटोचालकांसाठी आणि मुलीच्या लग्नासाठी विम्याची योजना आणली होती.