अबब..! १६४ कोटींची पाणीपट्टी थकली
अवघी २५ कोटी वसुली; महापालिकेकडून थकबाकीदारांना निघणार वॉरंट
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-20 12:53:04
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : मनपा करसंकलन विभागाने घरपट्टी वसुलीत जरी आघाडी घेतली असली, तरी पाणीपट्टी वसुलीत मोठी पिछाडी पाहायला मिळत आहे. पाणीपट्टी थकबाकीचा आकडा १६४ कोटींवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात आयुक्तांनी ७५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते; परंतु करसंकलन विभागाला जेमतेम २५ कोटी पाणीपट्टी वसुली करता आली असून, थकबाकीदारांविरोधात वाॅरंट अस्त्र वापरले जाणार आहे.
मनपाच्या आर्थिक उत्पन्नात करसंकलन विभाग महत्त्वाचा असून, घरपट्टी व पाणीपट्टीमुळे अडीचशे कोटींचे उत्पन्न मनपाच्या तिजोरीत जमा होते. एप्रिल ते जून सवलत योजना व त्यानंतर दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अभय योजनेमुळे थकीत घरपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत घरपट्टी वसुली ३८ कोटी सरप्लस आहे.
अभय योजनेमुळे बिलावरील शास्तीचा फुगवटाही कमी झाला आहे. मात्र घरपट्टी वसुलीत मुसंडी मारलेली असताना करसंकलन विभागासाठी पाणीपट्टी वसुली डोकेदुखी ठरत आहे. नागरिक पाणीपट्टी भरत नसल्याने थकबाकीचा आकडा १६४ कोटींच्या घरात पोहोचला आहे. शहरात सव्वादोन लाख नळ कनेक्शनधारक आहेत. मनपाकडून अगदी पाच रुपयांत हजार लिटर पिण्यायोग्य पाणी पुरवले जाते. मात्र नागरिकांकडून पाणीपट्टी अदा करण्यात कुचराई केली जात आहे.
मनपाकडून पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार दरवर्षी पार पाडले जातात. पण नागरिक त्यास जुमानेसे झाले आहेत. मनपाकडून नळकनेक्शन तोडण्याची कारवाई हाती घेतली जाते. परंतु राजकीय दबावापुढे मनपा प्रशासन नांगी टाकते. परिणामी थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, पाणीपुरवठ्याचा खर्चही निघेनासा झाला आहे. सर्वाधिक थकबाकी पंचवटी व त्या खालोखाल नाशिक रोड विभागाची आहे. दरम्यान, मार्चएन्ड जवळ आला असून, आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करसंकलन विभागाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाॅरंट बजावून नळकनेक्शन तोडले जाणार आहे.
बिले वाटपाचा सावळा गोंधळ
करसंकलन विभागाकडून घरपट्टीची बिले वेळेवर अदा केली जातात. त्यामुळे त्याची वसुलीही वेळेवर होते. परंतु पाणीपट्टी वाटपासाठी रीडिंग घ्यावे लागते. त्यानंतर बिल जनरेट होऊन वाटप होते. यंदा लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे करसंकलन विभागाचे कर्मचारी जिल्हा निवडणूक शाखेला वर्ग करण्यात आले होते. त्यामुळे वर्ष संपत आले तरी बिल वाटप रखडले आहे. बिल वाटप झाल्यानंतर वसुलीला मुहूर्त लागेल. त्यामुळे आयुक्तांनी दिलेले ७५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट गाठताना करसंकलन विभागाची दमछाक होणार आहे.
विभागनिहाय पाणीपट्टी थकबाकी
सातपूर - २१ कोटी ८६ लाख, पंचवटी - ३५ कोटी ६६ लाख, नवीन नाशिक - ३० कोटी ४७ लाख, नाशिक रोड - ३३ कोटी १८ लाख
नाशिक पश्चिम - १३ कोटी ९८ लाख, नाशिक पूर्व - २९ कोटी ८२ लाख