लग्न सराई संपताच सोने-चांदी दरात घसरण
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-20 14:53:44

नवी दिल्ली: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याज कपातीसंदर्भातील निर्णयानंतर त्याचे परिणाम भारतात पाहायला मिळाले. एकीकडे शेअर मार्केट कोसळले तर दुसरीकडे सोने आणि चांदीचे दर घसरले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात वाढ झाली मात्र स्थानिक सराफ बाजारामध्ये दरात घसरण झाली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नांचा हंगाम संपताच सोने आणि चांदीच्या दरांमधील तेजी कमी झाली आहे.
कमोडिटी बाजारात सोने दरात तेजी असली तरी स्थानिक सराफ बाजारात सोने स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.१० ग्रॅम सोनं यावेळी ७७,००० रुपयांपेक्षा कमी दरात उपलब्ध होत आहे. १० ग्रॅम सोन्याचा उच्चांकी दर ८२ हजार रुपये होता, त्यापेक्षा कमी दरात सोने मिळत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. १६४ रुपये किंवा ०.२२ टक्क्यांनी सोने दरात वाढ झाली. १० ग्रॅम सोनं ७५,८१५ रुपयांवर पोहोचले होतं. हे फेब्रुवारीच्या वायद्याचे दर आहेत. याशिवाय चांदीच्या दरात ११३ रुपये म्हणजेच ०.१३ टक्के वाढ झाली होती. चांदी ८७,३०० रुपये प्रति किलो या दराने विकली जात आहे.
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची विक्री आज ७६,९५० रुपयांना केली जात आहे. सोन्याचा दर ३३० रुपयांनी स्वस्त झाला. मुंबईत १० ग्रॅम सोन्याचा दर ३३० रुपयांनी स्वस्त झाला असून ७६,८०० रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईत देखील मुंबईप्रमाणेच दर आहे. कोलकाता येथे देखील १० ग्रॅम सोन्याच्या दरात ३३० रुपयांची घसरण झाली असून दर ७६८०० रुपयांवर आहेत.