संगीत शिक्षकाने मुलांवर केले लैंगिक अत्याचार

पुण्यातील धक्कादायक घटना

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-20 15:22:43

 पुणे :-  पुण्यातील एका शाळेत संगीत व नृत्य शिक्षकाने मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  शाळेत मुलांचे समुपदेशन केले जात असताना हा संपूर्ण प्रकार शिक्षकांना कळाला.या नराधमाच्या विकृतीला बळी पडलेली  मुलं ही चौथीमध्ये आणि सहावीमध्ये शिकणारी आहेत.   या शिक्षकाची  २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान या नामांकित शाळेच्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच  या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याने वारजे  पोलिसांनी  संस्थाचालकास बेड्या ठोकल्या आहेत.  

  सन २०२२ ते २०२४  या दोन वर्षांमध्ये एकूण चार मुलांवर या  शिक्षकाने अत्याचार केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.  या घटनेमुळे  पालकांना चांगलाच धक्का बसला आहे. अन्वित फाटक असे संस्थाचालकाचे नाव आहे.

 पुण्यातील कोथरुड भागातील कर्वेनगर परिसरात  एका नामांकित शाळेत मंगेश साळवे या संगीत शिक्षकाकडून गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील मुलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते. मंगेश साळवे हा शाळेतील सहावी, सातवी मधील मुलांना अनेकदा शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षे ही बाब लक्षात आली नाही. एका मुलाला मंगेश साळवेकडून शारिरीक इजा झाल्यानंतर त्याने ती बाब त्याच्या पालकांना सांगितली. त्यानंतर आणखी तीन पालकांनी देखील त्यांच्या पाल्याबाबत असाच प्रकार घडल्याची तक्रार दाखल केली आहे.   

या संपूर्ण प्रकरणानंतर शाळेने एक पत्रक प्रसिद्ध करुन झालेला प्रकार नमूद करत  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो. या घटनेच्या पार्श्वभुमीवर आम्ही अधिक काळजी घेऊ आणि आमच्याकडे नेमणूक होणाऱ्या स्टाफची पूर्ण तपासणी केली जाईल याची काळजी घेऊ", असे म्हटले आहे.