नमामि गोदा, आयटी पार्कला मिळणार चालना

मनपा अधिकारी नागपूरला, सचिवांपुढे आज सादरीकरण

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-20 16:14:33

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : मागील काही वर्षांपासून रखडलेल्या नाशिकमधील बहुचर्चित आयटी व लाॅजिस्टिक पार्क, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नमामि गोदा या प्रकल्पांना चालना मिळण्याची चिन्हे आहेत. महापालिका अधिकारी शुक्रवारी (दि. २०) मंत्रालय सचिवांपुढे त्याचे सादरीकरण करणार आहेत. त्यासाठी मनपाचे पथक नागपूरला रवाना झाले आहे. 
       राज्यात भाजपच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यानंतर व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नाशिक मनपात त्यांच्या सत्ताकाळात रेंगाळलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेत भाजपच्या सत्ता काळात माजी महापौर 
सतीश कुलकर्णी यांनी शहरात आयटी व लाॅजिस्टिक पार्कचे भूमिपूजन केले होते. त्यासाठी शहरात आडगाव येथे जागाही निश्चित केली होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्राने मंजुरी दिली होती.
दरम्यान, महापालिकेत प्रशासकीय राजवटीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी   डीपीआर बनविण्यासाठी नव्याने प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे म्हटले होते. पण हे दोन्ही प्रकल्प थंड पडले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून भाजपला लक्ष्य करण्यात आले. फडणवीस यांच्या 'दत्तक नाशिक' घोषणेवरून भाजपला डिवचण्यात आले. आता राज्यात भाजपची सत्ता व फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने रेंगाळलेल्या या प्रकल्पांना पुन्हा गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 
         नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असून, सचिवांकडून या प्रकल्पाचा आज आढावा घेतला जाणार आहे. मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांचे पथक नागपूरला रवाना झाले आहे.

आयटी पार्कमुळे रोजगाराच्या संधी

नाशिकमध्ये आयटी पार्कसाठी आयटी परिषदही भरविण्यात आली होती. आडगाव शिवारात ३६५ एकर क्षेत्रात आयटी पार्क उभारण्यासाठी महापालिकेने स्वमालकीची दहा एकर जागा आरक्षित केली. या जागेव्यतिरिक्त उर्वरित जागा एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट या तत्त्वावर जागामालकांकडून भाडेतत्त्वावर घेतली जाणार होती. त्यासाठी इच्छुक जागामालकांकडून मनपाने प्रक्रियादेखील राबवली. पण पुढे काम रेंगाळले.