चतुरस्र व्यक्तिमत्त्व
Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-21 11:52:47
दैनिक 'देशदूत'चे संस्थापक, प्रख्यात उद्योजक, सहकार नेते, साहित्य वर्तुळातील मुशाफिर, एक उत्तम वाचक व समीक्षक, नवोदित लेखकांचे मार्गदर्शक, अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणारे व तेवढेच शांत, मृदु व्यक्तिमत्त्व असणारे देवकिसन सारडा यांचे शुक्रवारी (दि. २०) निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग, सहकार, पत्रकारिता, सामाजिक व नवसाहित्यिकांच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 'देशदूत'सारख्या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक असतानाही ते प्रसिद्धिपराङमुख राहिले. त्यांच्या नावातच देव असल्याने एका हाताने केलेले दातृत्व दुसऱ्या हातालादेखील माहीत होऊ दिले नाही. सिन्नर ते नाशिक असा त्यांचा प्रवास शहर आणि खेड्यांतील सामाजिक, आर्थिक, वैचारिक अंतर दूर करणारा ठरला. विडी उद्योगातून त्यांनी आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला असला, तरी ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. उद्योग व सहकार क्षेत्रात नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करणारे देवकिसन सारडा यांना मात्र त्यांच्यातील साहित्यिक स्वस्त बसू देत नव्हता. त्यांनी नाशिकच्या वर्तुळातील अनेक हातांना लिहिते केले. अनेक नवसाहित्यिक घडवले. त्याकाळी नाशिकमध्ये हातावर मोजण्याइतकीच एक-दोन वृत्तपत्रे होती. मात्र, नाशिकच्या मातीतील एक वृत्तपत्र असावे, जे समाजात नवी आशा निर्माण करेल, तरुणांना नवी दिशा दाखवेल, अशी त्यांची सुरुवातीपासून इच्छा होती. त्यामुळे त्यांनी 'देशदूत' वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. मर्यादित साधनसामुग्रीच्या आधारावर त्याकाळी वृत्तपत्र काढणे ही सर्वसाधारण गोष्ट नव्हती. डॉ. नानासाहेब परुळेकर, कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर आदी साहित्य क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत नाशिकला त्यांनी वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र नवोदित साहित्यिकांसाठी एक व्यासपीठ ठरले. या व्यासपीठावरून त्यांनी वेळोवेळी नवोदित साहित्यिकांना योग्य ते मार्गदर्शनही केले. एक संपादक हा उत्तम वाचक असायला हवा, तरच तो साहित्याला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो. देवकिसन सारडा हे त्याच धाटणीतील संपादक होते. केवळ साहित्य नाही, तर लोकांच्या अन्यायाला त्याकाळी वाचा फोडण्याचे काम त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केले. त्यातूनच अनेक राजकारणी नाशिकच्या वर्तुळात घडले. वस्तुनिष्ठ वृत्तांकनावर त्यांचा जास्त भर होता. त्यामुळे 'देशदूत' हे पत्रकार, साहित्यिकांचे खऱ्या अर्थाने विद्यापीठ बनले. शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी यांनी ऊसदरासाठी त्याकाळी उभारलेल्या आंदोलनाला 'देशदूत'ने अफाट प्रसिद्धी दिली. त्यामुळे 'देशदूत'ची शेतकरी मित्र ही नवीन ओळख निर्माण झाली. पत्रकारितेचा त्यांनी अतिरेक होऊ दिला नाही. सभ्यपणा हे त्यांचे मोठे शस्त्र बनले. अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक संकटे येऊनही त्यांनी आपला निष्पक्षपातीपणा सोडला नाही. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणताना स्वतःवर मात्र राजकीय शिक्का बसू दिला नाही. पत्रकारितेबरोबरच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सिन्नर व्यापारी बँक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, जळगाव जिल्हा सहकारी बँक, नाशिक औद्योगिक सहकारी वसाहत (नाईस), नाशिक औद्योगिक कारखानदार संघ (निमा), ऑस्टिम, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अशा विविध संस्थांवर त्यांनी पदे भूषवली. दिल्लीतील अखिल भारतीय लघुउद्योग महासंघाचे ते पूर्वाध्यक्ष होते. दोन दशके ते माहेश्वरी जनकल्याण संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे ते संस्थापक व सात वर्षे अध्यक्ष होते. याशिवाय पोस्ट व तार खाते, टेलिकम्युनिकेशन सल्लागार समित्या, मध्य व पश्चिम रेल्वेच्या विभागीय सल्लागार समित्या, केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती, प्राप्तिकर, केंद्रीय अबकारी कर यासंबंधीच्या विविध सल्लागार समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी पाहिले. लघुउद्योगांच्या विकासासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या 'सिडबी' बँकेच्या पहिल्या संचालक मंडळाचे ते सभासद होते. केंद्रीय किमान वेतन सल्लागार मंडळ, लघुउद्योग मंडळावर काही वर्षे सभासद राहिले आहेत. सन १९५९ मध्ये सिन्नर व्यापारी बँकेची स्थापना करून नाशिक, नगर, सोलापूर व बुलढाणा या जिल्ह्यांतील नागरी सहकारी बँका सुरू करण्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी मुंबईच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षपदी १९६८ मध्ये सर्वानुमते निवडून आले. 'नाईस'च्या माध्यमातून त्यांनी नाशिकमधील उद्योजकांचे संघटन निर्माण करून त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडल्या. खेड्यापाड्यांतील अनेक गुणवंतांना हेरून त्यांनी त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. या सर्व व्यापात त्यांनी वाचनाचा छंद सोडला नाही. जिल्ह्यासह राज्यातील अनेक साहित्यिकांचा त्यांनी गोतावळा निर्माण केला. साहित्यिकांची मैफील जमवून त्यांच्याशी गप्पा मारण्याचा त्यांनी वेगळाच छंद जोपासला होता. साहित्यिकांच्या या मैफलीतून त्यांनी अनेक नवसाहित्यिक निर्माण केले. एखाद्या साहित्यावर त्यांनी केलेली समीक्षा एक वेगळाच वाचनानंद देऊन जात असे. त्यांच्या या सर्व मुशाफिरीत त्यांना साथ लाभली ती त्यांच्या अर्धांगिनी कमलाबाई सारडा यांची. कमलाबाई या नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेवर संचालिका होत्या. यातूनच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या अध्यक्षा, माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांच्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. अनेक सामाजिक उपक्रमांत या दोन्ही घराण्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व आज इहलोकाच्या प्रवासाला गेले. त्यांच्या जाण्याने नाशिकची तटस्थ पत्रकारिता हरवली आहे. नवसाहित्यिकांचा मार्गदर्शक हरपला आहे. उद्योग व सहकार क्षेत्रांत पोकळी निर्माण झाली आहे. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दैनिक 'लोकनामा' परिवारातर्फे श्रद्धांजली!