सूत्रधाराला शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही

शरद पवारांचे मस्साजोग ग्रामस्थांना आश्वासन

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-21 15:09:44

बीड :-  मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे विधानसभा व लोकसभेतही पडसाद उमटले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडचे खासदार बजरंग सोनावणे, खासदार नीलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या समवेत   मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.   तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत असे आश्वासन दिले. 

शरद पवार यानी यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा  घटनाक्रम  कुटुंबियांकडून समजून घेतला.  देशमुख यांच्या कुटुंबियांचे सात्वन केलं. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भावूक झाले.  तर गावकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर गांवकऱ्यांनी न्यायासाठी आक्रोश केला.  आम्ही सगळे भयभीत आहोत. उद्या कुणाचा नंबर लागेल, याचा नेम राहिला नाही, असं गावकरी म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली. 

पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला, त्याबाबत खोटं सांगितलं. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा, जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे, त्यालाही अशीच शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला काहीच नको, न्याय हवाय, असे संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांना सांगितले.  

गांवकऱ्यांशी संवाद साधताना  शरद पवार म्हणाले, “बीड जिल्ह्यात जे काही घडलं ते कोणालाही न पटणारं आणि सहन न होणारं आहे. ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली आहे त्यांनी गेली १५ वर्षे इथल्या लोकांसाठी भरपूर काम केलं आहे. त्यांनी लोकसेवेचे काम केल्यामुळेच लोकांनी १५ वर्षे त्यांची निवड केली. तो तरुण सरपंच येथील लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी समरूप होणारा होता. वादविवादापासून दूर राहणारा होता. असा हा तरुण कर्तबगार लोकप्रतिनिधी तुमच्या गावात काम करत होता. परंतु, येथील कोणाला तरी दमदाटी झाली आणि त्या प्रकरणी चौकशी करत असताना चौकशी करण्याची भूमिका का घेतली म्हणून बाहेरून कोणीतरी येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. हा हल्ला शेवटी त्यांच्या हत्येपर्यंत जातो हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. राज्य सरकारला व केंद्र सरकारला याची नोंद घ्यावीच लागेल.सरकारने याच्या खोलात जायला हवं. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याच्या मुसक्या आवळायला हव्यात. हल्लेखोर व त्याचा कोणाशी संवाद चालू होता ही सगळी माहिती बाहेर काढली पाहिजे. वस्तूस्थिती समोर आणली पाहिजे.