‘घरचा आहेर’
Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-27 11:54:22
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात काही महिला या चक्क लग्न समारंभासह प्रत्येक कार्यक्रमात साड्या देण्याच्या प्रथेस विरोध करताना दिसत आहेत. व्हिडिओमधील या महिला आगरी कोळी समाजाच्या असून, हातात बॅनर घेत रस्त्यावर उतरून, ‘बंद करा, बंद करा साड्यांचा आहेर बंद करा’ अशी घोषणा देत आहेत. एक प्रकारे प्रत्येक कार्यक्रमात साडी देण्याच्या परंपरेला त्या विरोध दर्शवीत आहेत. आगरी कोळी समाजात फक्त लग्नच नाही, तर प्रत्येक शुभ कार्यात महिलांना साडी देण्याची परंपरा आहे. शुभ कार्यातून या मानापानाच्या साड्यांवरच सर्वाधिक पैसा खर्च होतो. त्यामुळे ही परंपरा बंद करण्यासाठी उरणमधील कोपर गावातील महिलांनी हे अनोखे आंदोलन छेडले आहे. या महिलांनी लग्न, पूजा, ओटी भरणी अशा कार्यक्रमांना साड्या घ्यायच्या नाहीत, असा निर्णय घेतला आहे. कोपर गावातील या महिलांच्या आंदोलनावर आता सर्वांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, महिलांनीच आता याबाबत पुढाकार घेतल्याने प्रत्येक गावातून याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे. लग्न व इतर कार्यात आहेर किंवा भेटवस्तू देणे-घेणे ही एक फार प्राचीन परंपरा आहे. मात्र काळानुरूप ही प्रथा राहिली नसून तो एक साट्यालोट्याचा एक समाजिक व्यवहार बनला आहे. म्हणजेच एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे. आपल्याला एखाद्याने जितक्या किमतीचा आहेर दिलेला असतो त्याच तोलामोलाचा आहेर त्याच्या मुलांच्या लग्नात द्यावा लागतो. कोणी काय किमतीचा आहेर दिला होता हे अनेक वर्षांनंतरसुद्धा लक्षात ठेवावे लागते. विशेषतः अनेक गोष्टींचा विसर पडणाऱ्या महिलांना लग्नकार्यात व इतर प्रसंगी साडीची होणारी देवाण-घेवाण चांगल्या प्रकारे लक्षात राहते. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो, पण लग्नात नवरा-नवरीच्या कपड्यांपेक्षा मानापानाच्या साड्यांचा विषय नेहमी चर्चिला जातो. वधू व वर यांच्या आईचे लक्ष लग्नावर कमी, पण आहेराच्या साड्या प्रत्येकाला मिळाल्यात का, यावरच जास्त असते. आहेर ही परंपरा आपल्या इतकी अंगवळणी पडली आहे की, ती वस्तू काय आहे, तिची उपयुक्तता काय या बाबी लक्षात न घेता आहेर किंवा भेटवस्तू दिल्या-घेतल्या जातात. आजकाल जवळचे लग्न नसेल तर हा आहेर घेणेदेखील परवडत नाही. त्यामुळे जवळच्या नात्यातील लग्न नसेल तर साड्या विकत न घेता कुठली तरी आहेरात आलेली साडी, त्यावर अनेक घरे फिरून आलेले ब्लाऊजपीस देऊन बोळवण केली जाते. हा प्रकार केवळ शुभ कार्यातच घडतो असेही नाही. तर तेरावे, वर्षश्राद्ध या कार्यक्रमांतूनदेखील दु:ख काढण्याचा नावाखाली मळकटलेले म्हणजेच दहा घरे फिरून आलेले कपडे, टॉवेल-टोप्या दिल्या जातात व एक प्रकारचा सोपस्कार पार पाडल्या जातो. मात्र यातून अनेकवेळा वाद घडून अबोला धरला जातो. ज्या लग्नात दोन घराण्यांमध्ये ऋणानुबंध जोडले जातात, त्याच घरांत साडी देण्या-घेण्यावरून अनेक वर्षांचे जुने संबंध तोडले जातात. आजकाल ‘आहेर नको, हवेत फक्त आशीर्वाद’ ही प्रथा काही प्रमाणात रुजत असली, तरी हा सल्ला फक्त बाहेरच्या लोकांसाठी असतो. जवळच्या नातेवाइकांकडून साडीची अपेक्षा हमखास केली जाते. फॅशन, ट्रेंड व स्टाईलच्या नावाखाली लग्नासारखा शुभ कार्यातून आपण अनेक पारंपरिक व धार्मिक प्रथा मोडीत काढत असताना आहेराच्या साडीवर मात्र आजही आडून बसतो. कोरोना काळात अनेक लग्नकार्ये साध्या पद्धतीने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र. कोरोनामुळे लग्नावर होणारा वायफळ खर्च आता येथून पुढे कमी होईल असे वाटत असताना लग्नकार्यास सोहळ्याचे कमी मात्र उत्साहाचे स्वरूप जास्त येऊ लागले आहे. अंबानीसारखे लक्ष्मीपुत्र आपल्या मुलाच्या लग्नसोहळ्याला इव्हेंट बनवतात. तोही आठवडाभर नाही, तर सहा महिने चालणारा व हॉलीवूडपासून बॉलीवूड इंडस्ट्रीतल्या दिग्गजांना पैशांच्या तालावर नाचवणारा. पण म्हणून आपणही तोच कित्ता गिरवणे कितपत संयुक्तिक ठरेल? खरंतर लग्न हा दोन परिवार व अनेक मने जोडणारा सोहळा आहे. हिंदू धर्मांत या सोहळ्याला पवित्र संस्कार मानले गेले आहे. मात्र रुढी, परंपरा विसरून या सोहळ्याला आपण आता इव्हेंट बनवू लागलो आहोत. आगरी-कोळी समाजातील महिलांनी या विवाह सोहळ्यातील साड्यांच्या आहेराविरोधात मोर्चा काढला आहे. मात्र इतर समाजात या सोहळ्याला देण्यात येणाऱ्या इव्हेंटच्या स्वरूपाविरोधातदेखील महिलांनीच आता पुढे येण्याची गरज आहे. प्री-वेडिंग शूटसारख्या इव्हेंटमुळे विवाह सोहळ्यातून काही दिवसांनी आंतरपाट ही संकल्पनाच नाहीशी होईल. अशा अनेक इव्हेंटरूपी संकल्पनांचे पारंपरिक लग्नसोहळ्यावर अतिक्रमण झाले आहे. याविरोधातदेखील आता आवाज उठवण्याची गरज आहे. यातील आहेराची साडी या प्रथेविरोधात आगरी-कोळी समाजातील महिलांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे महिलांनी महिलांसाठी दिलेला ‘घरचा आहेर’च समजावा लागेल.