विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

राज्यात चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-27 12:37:34

मुंबई :- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण ओसरले आहे. सध्या सर्वत्र धुक्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, आता पुन्हा निसर्गाचा लहरीपणा समोर यायला लागला असून राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर पुण्यासह वीस जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.  आज आणि उद्या (दि.२७ आणि  २८ डिसेंबर रोजी ) राज्यातील बहुतांश भागांमध्ये दोन दिवस पाऊस आणि थंडीचे वातावरण राहणार आहे.  दरम्यान, बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून राज्यात बाष्पयुक्त वारे आले आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने थंडीची लाट आहे. त्या शीतलहरी हवेच्या वरच्या थरांतून खालच्या थरांतही येते आहेत. त्यामुळे थंड वारे सुटत आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस राज्यात पाऊस आणि थंडी असे संमिश्र वातावरण शुक्रवार व शनिवारी  राहणार आहे. 

 पुणे, नाशिकसंह राज्यातील अन्य शहरांमध्ये थंडीचा जोर कमी झाला असून पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वेटर्ससोबत रेनकोट देखील सोबत ठेवण्याची वेळ डिसेंबरमध्ये नागरिकांवर येणार आहे.   गेल्या चोवीस तासांमध्ये  अनेक  जिल्ह्यांमधील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ झाली आहे. पावसाची शक्यता वर्तवली जात असली तरी देखील हवेत गारवा कायम आहे. ढगाळ वातावरण राज्यात काही शहरांमध्ये दिसून येत आहे. 

  नाशिक, धुळे,जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पुढील चोवीस तासांत मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होईल, अशी शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर जळगाव, अहिल्यानगर येथे गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.