लाल तिखटाचा लागणार ठसका

आवक कमी झाल्याने दराचा भडका !

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-27 13:22:33

नंदुरबार : मिरचीचे आगार समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरचीचे उत्पादन घटल्याने बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्यांनी आवक कमी झाली आहे. परिणामी, यंदा लाल तिखटाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.वाढती मागणी पाहता व्यापाऱ्यांना गुंटूरहून लाल सुकी मिरची मागवावी लागण्याची शक्यता आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिरचीची आवक सुरु झाली. जवळपास तीन महिन्यात आतापर्यंत ४५ ते ५० हजार क्विंटल आवक झाली आहे. प्रारंभी ओल्या लाल मिरचीला २५०० ते चार हजार रुपये असा भाव मिळाला. सध्या तीन हजार ते ५१०० रुपये असा भाव मिळत आहे. कोरड्या लाल मिरचीला सहा हजार ते १२ हजार रुपये भाव आहे. जेमतेम दीड महिन्याचा हंगाम बाकी असून उर्वरित दिवसात ५० हजार क्विंटल आवक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच यंदा एक लाख क्विंटल मिरची बाजार समितीत येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तीन लाख क्विंटलहून अधिक आवक झाली होती. आवक घटल्याचा परिणाम लाल तिखटाचे भाव वाढण्यात होणार आहे. 

देशात आंध्र प्रदेशातील गुंटूरनंतर मिरची उत्पादनात नंदुरबार जिल्हा हा प्रसिध्द आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात ओल्या लाल मिरचीची आवक होते. ही मिरची पथारीवर सुकवून प्रक्रिया केल्यानंतर तिची लाल भुकटी बाजारात विक्रीसाठी आणली जाते. शेतकऱ्यांसाठी नगदी पीक मानल्या जाणाऱ्या मिरचीला यंदा जास्तीच्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे मिरची उत्पादकांचे नुकसान झाले. यंदा सरासरीपेक्षा २५ टक्के जास्तीचा पाऊस झाल्याने मिरची पिकावर मर आणि मूळ कुजवा रोगाचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी मिरचीची रोपे उखडून टाकली. शिल्लक पिकावरही रोग पडल्याने फुलोरा येऊ शकला नाही. परिणामी मिरची उत्पादनात घट झाली आहे.