चौथ्या कसोटीत भारत पुन्हा फॉलोऑनच्या छायेत
आघाडीची फळी पुन्हा फ्लॉप:पाच बाद १६४ अशी अवस्था
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-27 14:54:38
मेलबर्न :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या गावसकर-बॉर्डर ट्राफी स्पर्धेतील चौथ्या कसोटीत भारतीय संघ पुन्हा एकदा फॉलोऑनच्या छायेत सापडला आहे. भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांची हाराकिरी या सामन्यातही सुरुच असून दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था पाच बाद १६४ अशी झाली आहे. कांगारुंकडे अद्याप ३१० धावांची आघाडी असल्यामुळे भारताला फाॅलोऑन टाळण्यासाठी पुन्हा एकदा धडपड करावी लागणार आहे. ऋषभ पंच ६ आणि रवींद्र जडेजा ४ धावांवर खेळत आहे.
या कसोटीत पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ४ फलंदाजांच्या अर्धशतक आणि स्टीवन स्मिथच्या १४० धावांच्या जोरावर दुसऱ्या दिवशी ४७४ धावांचा डोंगर उभारला. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कॉन्स्टास ६० आणि उस्मान ख्वाजा ५७ धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेन ७२ धावा करून बाद झाला. त्यानंतर आज म्हणजे दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथ पॅट कॅमिन्स यांनी ११२ धावांची भागीदारी रचली. पॅट कॅमिन्स ४० आणि स्मिथ १४० धावा करुन बाद झाला. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने ४ तर रवींद्र जडेजाने ३ बळी घेतले. याशिवाय आकाश दीप २ आणि वॉशिंग्टन सुंदरनेही एक विकेट घेण्यात यश मिळवले.
यानंतर भारतीय डावाची सुरुवात पहिल्या तीन सामन्यांप्रमाणेच डळमळीत झाली. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी शतकी भागीदारी झाली, पण यशस्वी आणि विराट कोहली ( ३६) बाद झाल्यावर, रोहित शर्माचाही ( ३ धावा ) फ्लॉप शो सुरुच राहिला. केएल राहुल ( २४), आकाशदीप ( ० धावा ) भारताला सावरतील असे वाटत असतानाच त्यांनीही तंबूत परतणे पसंत केले . यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ८२ धावा केल्या. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा ३१० धावांनी मागे आहे, फॉलोऑन टाळण्यासाठी संघाला आणखी ११० धावांची आवश्यकता आहे.
दरम्यान, या कसोटीतही विराट कोहलीच्या बॅटमधून धावा न निघाल्याने चाहत्यांनी सोशल मिडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.