न्याय मिळत नाही तोवर लढा लढतच राहणार
संतोष देशमुख यांच्या मुलीचा आक्रोश मोर्चात निर्धार
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-27 15:34:40
बीड: मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. रेणापूर तालुक्यातील ५० पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चात सहभागी झाले. रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय या दरम्यान आयोजित या आक्रोश मोर्चात विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला. मात्र या मोर्चात लक्ष वेधून घेतले ते संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने. माझ्या वडिलांच्या हत्येसंदर्भातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी वैभवीने या मोर्चात केली. रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना या घटनेप्रकरणी अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, न्याय मिळत नाही तोवर लढा लढतच राहणार असा निर्धार वैभवीने बोलून दाखवला.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकारने ठोस पाऊल नाही उचलली तर एक जानेवारी रोजी रेणापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार. तसेच या प्रकरणाचा निकाल लागपर्यंत मुंडे बहीण भावाने मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, दोषींना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. इत्यादि मागण्यांचा समावेश तहसीलदार मंजुषा भगत यांना दिलेल्या निवेदनात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आसून हत्याप्रकरणातील आरोपीची सीआयडी कडून चौकशीला सुरुवात झाली आहे. विष्णू चाटे यांची सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.