घोषणा कर्डिलेंची, पदभार मात्र खत्रींकडे
घाईघाईत स्वीकारले आयुक्तपद : कर्डिले यांच्याकडे सिडकोची जबाबदारी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-27 15:49:45

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : नाशिक महापालिका आयुक्तपदावरून एका दिवसात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या असून, शासनाने राहुल कर्डिले यांची आयुक्तपदी नियुक्तीची काढलेली ऑर्डर २४ तासांत रद्द करत त्या जागेवर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त मनीषा खत्री यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती केली. खत्री यांनी अजिबात वेळ न दवडता गुरुवारी (दि. २६) सायंकाळी मनपा आयुक्तपदाचा घाईघाईत पदभार स्वीकारला. तर कर्डिले यांची सिडको, नवी मुंबईच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मनपात दिवसभर या ‘टांगा पलटी’ची जोरदार चर्चा रंगली होती.
शासनाने भूसंपादन प्रकरणात बदनामी झालेल्या तत्कालीन आयुक्त डाॅ. करंजकर यांची उचलबांगडी करत मंगळवारी (दि. २४) सायंकाळी वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक मनपा आयुक्तपदी नियुक्ती केली. कर्डिले हे मसुरी येथे प्रशिक्षण घेत असल्याने येत्या शनिवारी ते नाशिकला येऊन मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकरणार होते. मात्र, मागील २४ तासांत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. कर्डिले हे जरी भाजपच्या मर्जीतले असले, तरी त्यांच्या नियुक्तीवरून मंत्री गिरीश महाजन नाराज होते. त्यांना विचारात न घेताच ही नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. मंत्री महाजन नाशिक मनपा आयुक्तपदासाठी खत्री यांच्या नावाकरिता प्रचंड आग्रही होते. डाॅ. अशोक करंजकर यांची नियुक्ती करतानादेखील त्यांचा विरोध होता. त्यावेळी ते खत्री यांच्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र मुख्यमंत्री व पालकमंत्री हे शिवसेना शिंदे गटाचे असल्याने मंत्री महाजन यांना त्यांच्या इच्छेला मुरड घालावी लागली. परंतु आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असून, ते ठरवतील त्यालाच आयुक्तपदी नेमले जाणार हे स्पष्ट होते. परंतु त्यांना विश्वासात न घेता कर्डिले यांची नियुक्ती झाल्याने मंत्री महाजन नाराज झाले. त्यांच्या नाराजीची वरिष्ठांनी दखल घेत चोवीस तास होत नाही तोच, कर्डिले यांची नाशिक मनपा आयुक्तपदाची ऑर्डर रद्द केली. काही वेळेतच आयुक्तपदी मनीषा खत्री यांच्या नियुक्तीची नव्याने ऑर्डर निघाली.
अठरा वर्षांनंतर महिला आयुक्त
महापालिकेला अठरा वर्षांनंतर मनीषा खत्री यांच्या रूपाने महिला आयुक्त मिळाल्या आहेत. यापूर्वी १९९८ ते २००० या दोन वर्षांसाठी सुजाता सौनिक व विनिता सिंघल यांनी २००४ ते २००६ या कार्यकाळात आयुक्त म्हणून मनपात काम पाहिले आहे.महापालिकेला अठरा वर्षांनंतर मनीषा खत्री यांच्या रूपाने महिला आयुक्त मिळाल्या आहेत. यापूर्वी १९९८ ते २००० या दोन वर्षांसाठी सुजाता सौनिक व विनिता सिंघल यांनी २००४ ते २००६ या कार्यकाळात आयुक्त म्हणून मनपात काम पाहिले आहे.
पती जलज शर्मा जिल्हाधिकारी
नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा मनीषा खत्री यांचे पती आहेत. एकाच जिल्ह्यात पती जिल्हाधिकारी, तर पत्नी मनपा आयुक्तपदावर असे जिल्ह्यात पहिलेच उदाहरण असल्याचे पाहायला मिळते.
मनीषा खत्री यांचा परिचय
१ नोव्हेंबर २०१४ ला भारतीय प्रशासन सेवेत रुजू
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिसंख्य सहाय्यक पदावर काम
सहाय्यक जिल्हाधिकारी, पाचोरा उपविभाग
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती
सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, नागपूर
अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर
जिल्हाधिकारी, नंदुरबार
महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण