सिंग यांचे जीवन प्रामाणिकपणा व सौजन्याचे प्रतीक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रद्धांजली
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-27 16:29:46
नवी दिल्ली :- जनतेप्रती, देशाच्या विकासाप्रती डॉ.मनमोहन सिंह यांची बांधीलकी नेहमीच सन्मानपूर्वक पाहिली जाईल. डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा व सौजन्याचं प्रतीक होते. ते एक उत्तम संसद सदस्य होते. त्यांची विनम्रता, सौम्यता आणि प्रगाढ बौद्धिक सामर्थ्य त्यांच्या संसदीय कार्यकाळाची ओळख ठरले. संसद सदस्याच्या रुपात मनमोहन सिंग यांची निष्ठा सगळ्यांसाठी प्रेरणादायी होती. अधिवेशनाच्या काळात महत्त्वाच्या दिवशी ते व्हीलचेअरवर येऊन आपली ससदीय जबाबदारी पार पाडत होते”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण केली आहे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. देशभरात आज राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. राजकीय वर्तुळाबरोबरच सामाजिक आणि इतरही क्षेत्रांमधून मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशानं एक अभ्यासू अर्थतज्ज्ञ आणि मितभाषी व्यक्तीमत्व गमावल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली देणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आपल्यातून जाणे एक देश म्हणून आपले खूप मोठे नुकसान आहे. फाळणीच्या काळात खूप काही गमावल्यानंतर ते भारतात आले, तेव्हा अनेक संघर्ष, आव्हानानांना ते सामोरे गेले. पण जिद्दीने परिस्थितीवर मात करत नवी क्षितिजं गाठली जाऊ शकतात, याची शिकवण त्यांचे जीवन भावी पिढीला देत राहील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी या संदेशात नमूद केले.
“एका चांगल्या व्यक्तीच्या रुपात, एका विद्वान अर्थतज्ज्ञाच्या रुपात आणि सुधारणांच्या बाबतीत समर्पित नेत्याच्या रुपात त्यांना कायम स्मरणात ठेवलं जाईल. एका अर्थतज्ज्ञाच्या रुपात त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर भारत सरकारमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. एका आव्हानात्मक काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारीही सांभाळली. माजी पंतप्रधान भारतरत्न पी. व्ही. नरसिंह राव सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना त्यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या देशाला नव्या अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आणलं. पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील”, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांनी विविध पदांवर राहून देशाच्या केलेल्या सेवेचा उल्लेख केला.