“पगडीतील त्या व्यक्तीची खूप आठवण येईल”
अनुपम खेर यांची सिंग यांना आदरांजली
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-27 18:17:56
मुंबई :- ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात डॉ.मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोशल मिडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉ.मनमोहन सिंग यांच्या आठवणी तसेच चित्रपटाच्या काही आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत. “पगडीतील त्या व्यक्तीची खूप आठवण येईल” असे अनुपम खेर यांनी या व्हिडिओला शीर्षक दिले आहे.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला समजून घेण्यासाठी मी दीड वर्ष त्यांचा अभ्यास केला, त्यांचा स्वभाव, वर्तन, आणि वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. मनमोहन सिंग हे मुळातच चांगले, सौम्य, हुशार, आणि दयाळू होते. जर तुम्ही ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपट आता पाहिलात, तर तुम्हाला दिसेल की, मी त्यांच्या काही गुणांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला काही कारणांमुळे मी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या सिनेमातील भूमिका मला माझ्या करिअरमधील सर्वांत आवडत्या आणि प्रामाणिकपणे साकारलेल्या भूमिकांपैकी एक वाटते, असे गौरवोद्गार खेर यांनी या व्हिडिओत काढले आहेत.
मी डॉ. मनमोहन सिंग यांना १-२ कार्यक्रमांमध्ये भेटलो होतो. ते माझ्याशी खूप चांगले वागले. त्यांचा प्रामाणिकपणा आणि लोकांना ऐकून घेण्याची तयारी ही खूप सुंदर गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे. त्यांचा दयाळूपणा आजच्या काळात दुर्मिळ आहे. जेव्हा चित्रपट बनला, तेव्हा मला आनंद झाला की, मी न्याय देऊ शकलो. विषय वादग्रस्त असू शकतो, पण तो माणूस वादग्रस्त नव्हता. पगडीतील त्या व्यक्तीची खूप आठवण येईल. देशाने एक प्रामाणिक माणूस आणि महान नेता गमावला आहे, अशा शब्दात अनुपम खेर यांनी आदरांजली अर्पण केली आहे.