२१ वर्षीय नितीशचे घणाघाती शतक : फॉलोऑन टळला

ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा तिसरा युवा खेळाडू

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-28 12:37:14

मेलबर्न :- ५ बाद १६४ अशी भारतीय संघाची अवस्था असताना, ३७४ धावांचा डोंगर सर करताना फॉलोऑन अटळ आहे असे वाटत असतानाच २१ वर्षांचा नितीश रेड्डी मैदानात उतरतो, १० चौकार, एक षटकार ठोकत अवघ्या १७१ चेंडूत आपले पहिले कसोटी शतक झळकावून संघाला सामन्यात पुन्हा उभा करतो. हा चमत्कार नसून नितीशची जिद्द भारतीय संघाच्या मदतीला धावून आली आहे. नितीशच्या १०३ धावांच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारतीय संघात जल्लोष पाहायला मिळाला.   नितीश रेड्डीचं शतक पूर्ण होताच त्याच्या वडिलांनी स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने १५९धावांवर ५ विकेट गमावल्या. तिसऱ्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी चांगली झाली नाही. पहिल्या सत्रात भारताने महत्त्वाच्या विकेट गमावल्या. संघाची धावसंख्या  १९१ असताना ऋषभ पंत  बाद झाला, यानंतर जडेजालाही नाथन लायनने बाद करुन भारताला संकटाच्या खाईत लोटले. यानंतर मैदानावर आलेल्या नितीश रेड्डीने भारताचा डाव  सावरला. पहिल्यांदा त्याने वॉशिंग्टन सुंदरबरोबर भागदारी रचत आणि बचावात्मक खेळीवर भर दिला. पण   संधी मिळताच आक्रमक फटके खेळत भारताचा फॉलोऑन वाचवला. यानंतर रेड्डीने आपले अर्धशतक पूर्ण केले.  

नितीश रेड्डी ९७ धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. यानंतर मैदानात आलेला जसप्रीत बुमराह २ चेंडू खेळत बाद झाल्याने ८वी विकेट पडली. यानंतर सिराज मैदानावर आला. मोहम्मद सिराज किती चेंडू खेळू शकेल, याची सर्वांनाच चिंता होती. पण सिराजने बचावात्मक फलंदाजी करत कमिन्सचं षटक खेळून काढलं आणि पुढच्या षटकात नितीश रेड्डीला स्ट्राईक दिली. नितीश रेड्डीने एक डॉट बॉल खेळत पुढच्या चेंडूवर चौकार लगावत शतकाचं स्वप्न पूर्ण केलं.  २१ वर्षीय नितीश रेड्डीच्या शतकामुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली आहे. नितीश रेड्डीने वॉशिंग्टन सुंदरबरोबर १२७ धावांची मोठी भागीदारी रचली. सुंदर आणि नितीश रेड्डीची ही ८व्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताची दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. वॉशिंग्टन सुंदरनेही नितीशच्या जोडीने अर्धशतक पूर्ण केले. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या ९ बाद ३५८ धावा झाल्या होत्या. 

नितीश रेड्डीचं ऐतिहासिक शतक

नितीश कुमार रेड्डी बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. नितीशने वयाच्या २१ वर्षे २१६ दिवसात ही कामगिरी केली आहे. याआधी कार्ल हूपरने वयाच्या २१ व्या वर्षी ०११ दिवसांत बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावले होते. तसेच भारतातर्फे ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा रेड्डी हा तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत यांनी ही कामगिरी केली आहे.नितीश रेड्डी याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. नितीशचे हे शतक याकरिता देखील खास आहे, की जिथे रोहित, विराट, राहुल यांसारखे दिग्गज वारंवार अपयशी ठरले, तिथे या पठ्ठ्याने भारताला मोठ्या संकटातून वाचवत अत्यंत आत्मविश्वासाने भरलेली खेळी करुन दाखवली.