माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अनंतात विलीन
मुलीने दिला मुखाग्नी: सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-28 13:29:58
नवी दिल्ली :- भारताच्या उदारीकरणाचे जनक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज ( दि.२८ डिसेंबर रोजी ) निगम बोधघाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या तोफखाना गाडीमधून त्यांचे पार्थिव दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे तिन्ही सैन्याने त्यांना सलामी दिली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील डॉ.सिंग यांना अखेरची मानवंदना दिली. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचे विधी पार पडले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या मुलीने मुखाग्नी दिला. डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले होते. ते ९२ वर्षांचे होते.
मनमोहन यांच्या पत्नी गुरशरण कौर, मोठी मुलगी उपिंदर सिंग (६५), दुसरी मुलगी दमन सिंग (६१) आणि तिसरी मुलगी अमृत सिंग (५८) निगम घाटावर उपस्थित होते. लष्कराच्या तोफखाना वाहनातून त्यांचे पार्थिव निगमबोध घाटावर आणण्यात आले होते. राहुल गांधी मृतदेहाशेजारीच गाडीत बसून होते. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मनमोहन यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.
मनमोहन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले होते. डॉ. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि मुलगी दमन सिंग यांनी काँग्रेस मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी, सोनिया आणि प्रियंका यांच्याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मनमोहन यांना अखेरचा निरोप दिला. जगभरातील अनेक नेत्यांनीही डॉ.मनमोहन सिंग यांनी सोशल मिडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.
काँग्रेसची नाराजी
मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यातआल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी स्मारक बांधले जावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी-शहा यांच्याकडे केली होती. मात्र, स्मारकाचे नेमके ठिकाण ठरवण्यासाठी काही दिवस लागू शकतात, असे गृहमंत्रालयाने रात्री उशिरा सांगितले.
निळी पगडी शेवटपर्यंत सोबत
अंत्यसंस्काराच्या वेळीही मनमोहन सिंग यांना निळी पगडी घातली होती. फिकट निळा हा सिंग यांचा आवडता रंग होता .हा रंग त्यांना केंब्रिज विद्यापीठाच्या दिवसांची आठवण करून द्यायचा, म्हणूनच ते नेहमी निळा पगडी घालत असत.