विदेशातही वाइनऐवजी घेतले साधे पाणी

स्व. मनमोहन सिंग यांच्या आठवणींना काकड यांच्याकडून उजाळा

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-28 13:55:41

धनंजय बोडके : लोकनामा 
नाशिक : माजी पंतप्रधान (दिवंगत) मनमोहन सिंग यांनी राजशिष्टाचाराचा अवमान न होऊ देता देश-विदेशात वाइनऐवजी साधे पाणी घेतले. परदेशात शिक्षण होऊन, अनेक देशांमध्ये भ्रमण करूनदेखील त्यांचा आहार हा शुद्ध आणि सात्त्विक म्हणजेच संपूर्ण शाकाहार होता. मोठ्या मनाचे असलेले सिंग हे सर्वच कर्मचाऱ्यांची आस्थेने विचारपूस करायचे. त्यांच्यासारखे साधे, सरळ, निस्पृह व्यक्तिमत्त्व देशाच्या राजकारणात पुन्हा होणे नाही. यासह तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सहवासात दहा वर्षे सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी पदावर काम केलेले मखमलाबादचे भूमिपुत्र साहेबराव काकड यांनी सिंग यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 
            श्री. काकड यांनी सीमा सुरक्षा दला (बीएसएफ)त काही काळ देशसेवा बजावली. पुढे देशातील अती अती महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा वाहणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी)मध्ये निवड होऊन श्री. काकड यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी म्हणून काम केले. त्यापूर्वी त्यांनी माजी पंतप्रधान (स्व.) अटल बिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यातदेखील अनेक वर्ष सेवा बजावली आहे. दिवंग माजी पंतप्रधान सिंग हे अगदी शिपायापासून ते उच्चपदस्थ अधिकारी यांना सारखेच समजायचे. त्यांची प्रत्येक कृती ही शीख संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे होती. त्यांच्या नाश्त्यामध्ये साधी भाजी त्यामध्ये अगदी भोपळा किंवा कुठलीही साधी भाजी व दोन चपात्या, पपई आणि दूध एवढेच असायचे. 
            पंतप्रधान म्हणून अनेक परदेशी समकक्ष किंवा अधिकाऱ्यांसमवेत शिष्टाचार भोज घेत असताना बऱ्याच वेळा वाइन त्यांच्यासोबत घेतली जाते. परंतु मनमोहन सिंग यांच्या ग्लासमध्ये साधे पाणी असायचे. त्यातील वाइन काढून घेण्याची जबाबदारी सुरक्षा अधिकाऱ्यांची असे, अनेकदा मी स्वतः त्यातली वाइन काढून घेऊन त्यांच्या ग्लासमध्ये  पाणी भरून ठेवले आहे. ते घेण्यापूर्वी ते संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याकडे बघायचे आणि वाइन काढून घेतली आहे, अशी खूण केल्यानंतरच त्या ग्लासला हात लावायचे.
         पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रोटोकॉल्स असतात. सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना ते एवढ्या उच्चपदावर असूनसुद्धा निमूटपणे ऐकत असत. उच्चशिक्षित विद्वान असूनदेखील ते स्वतः प्रचंड धार्मिक होते. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून गुरुद्वारामध्ये अनेकदा हजेरी लावत असत.
          त्यांचा चालण्याचा वेग हा इतर अधिकारी व मंत्र्यांपेक्षा जास्त होता. बऱ्याचदा त्यांच्या पत्नी गुरशरणजी कौर या मागे राहत. सुरक्षा अधिकाऱ्यांनी आठवण दिल्यावर मनमोहन सिंगजी थांबून त्यांची वाट बघत असत. अत्यंत साधी राहणी व कर्मचारी, अधिकारी यांच्याशी आपुलकीची त्यांची सदोदित वागणूक होती. मनमोहन सिंग यांची भाषणे उर्दू भाषेत लिहिली जात असत आणि नेहमी अगोदर तयार करून आणलेले भाषण वाचत असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजच्या पाकिस्तानमध्ये झाले होते, त्यांना हिंदी शिकवले गेले नाही. आणि त्यांनीही पुढे तसा प्रयत्न केला नसल्याचेही श्री. काकड यांनी सांगितले.