तीन वर्षीय चिमुरडीचा संशयास्पद मृत्यु
ग्रामस्थांचा आईवर संशय: पोलिसांनी घेतले ताब्यात
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-28 14:20:10

गोंदिया :- गोंदियामधील गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे ३ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गोरेगाव पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला असून मानसी ताराचंद चामलाटे (३) असे मृत पावलेल्या चिमुरडीचे नाव आहे. मानसीचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच मानसीच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकणार आहे.
मानसी ताराचंद चामलाटे ही चिमुकली आई गुनिता ताराचंद चामलाटे यांचेसोबत नागपूरमधील खापरखेडा येथे वास्तव्यास होती. २६ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह घेऊन मानसीची आई गुनिता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाला, असे तिने सांगितले. त्यांनतर २७ डिसेंबरला दुपारी गावातीलच स्मशानभूमीत मानसीचा दफनविधी पार पडला. मात्र मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे, असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृत मानसीची मोठी आई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसात २७ डिसेंबरला रात्री तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत आज ( दि.२८ डिसेंबर ) गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव यांच्या समक्ष हेटी येथे पुरण्यात आलेला मानसीचा मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी केटीएस रुग्णालय गोंदिया येथे पाठविला आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत मानसीची आई गुनिता चामलाटे हिला गोरेगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.