विठूरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी बुकिंग फुल्ल !

देशभरातून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-28 15:03:14

पंढरपूर : विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी..भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ… साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर… कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा…अशा सावळ्या-साजिऱ्या विठूरायाच्या दर्शनाची आस त्याच्या भक्तांना लागलेली असते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी येथे दर्शनासाठी जातात. मात्र विठूरायाचे दर्शन जर रोजच करता आले तर भक्तांच्या आनंदाला पारावार उरणार नाही, हीच भावना लक्षात घेऊन विठूरायाच्या नित्यपूजेसाठी संकेतस्थळावरून नोंदणी  सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणी सुरु होताच पहिल्याच दिवशी ३१ मार्च २०२५ पर्यंतची नोंदणी पूर्ण झाली आहे. या ‘ऑनलाईन’ नोंदणीला राज्यासह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सर्व पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजेसाठी अगोदर नोंदणी करण्याची पद्धत सुरू केली आहे.     https://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून ही नोंदणी करता येणार आहे.  २६ डिसेंबरपासून ‘ऑनलाईन’ नोंदणी सुरु होताच केवळ एकाच दिवसात ३१ मार्च २०२५ पर्यंतची नोंदणी पूर्ण झाली आहे. या योजनेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. श्रींच्या नित्यपूजा, तुळशी पूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.