मार्क वॉ, गावसकरांनी दिले रोहितच्या निवृत्तीचे संकेत
सिडनी कसोटी ठरणार शेवटची कसोटी?
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-28 15:46:30
मेलबर्न :- बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धा रोहित शर्मा याने सुरुवातीपासूनच गांभीर्याने घेतली नाही आणि त्याचेच परिणाम आता समोर असून रोहित खेळत असलेल्या तिसऱ्या कसोटीतही तो सपशेल अपयशी ठरल्याने रोहितला कसोटी क्रिकेटला रामराम करावे लागणार आहे. पहिल्या कसोटीत बायकोच्या बाळंतपणाचे कारण देऊन रोहित अनुपस्थित राहिला. पण शेवटच्या आठ कसोटींच्या १४ डावांत रोहितने केवळ १५५ धावा केल्या आहेत. आणि म्हणूनच सुनील गावसकरांपासून तर ऑस्ट्रेलियाच्या मार्क वाँपर्यंत सर्वांनीच रोहितच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
कांगारुंविरुद्धच्या महत्वाच्या मालिकेत रोहितकडून कर्णधार व एक महान फलंदाज म्हणून खूप अपेक्षा होत्या. पण रोहितने त्याच्या फलंदाजीवर मेहनत घेतलीच नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना फ्लॉप झाल्यानंतर रोहित मेलबर्नमध्ये यशस्वी जैस्वालसोबत सलामीला आला, पण पहिल्या डावातही त्याने निराशा केली.
रोहितच्या या फ्लॉप शोमुळे सुनील गावसकर म्हणाले की, 'हा त्याच्यासाठी कठीण काळ आहे. 'दुसरा डाव आणि सिडनी कसोटी बाकी आहे. या तिन्ही डावांत त्याने धावा केल्या नाहीत, तर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सुद्धा मेलबर्नमध्ये असून रोहितशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, रोहित कर्णधार म्हणून सतत अपयशी ठरत आहे. म्हणूनच संघ व्यवस्थापन संघात काही महत्वाचे बदल करु पाहत आहे. पहिली कसोटी जिंकून देणाऱ्या बुमराहने मालिकेत आतापर्यंत २५ विकेट घेतल्या आहेत. मालिकेतील पहिली कसोटी बुमराहच्या नेतृत्वात जिंकली होती. म्हणून कसोटीसाठी बुमराह यापुढे भारताचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे. रोहित फॉर्मात नाही आणि स्थिर वाटणाऱ्या सुरुवातीच्या जोडीत बदल केल्याने संघाचा समतोलही बिघडला आहे. जर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही तर सिडनी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची टेस्ट असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरच लगेचच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे . कर्णधारपद काढून घेतल्यावर रोहितचा खेळ बहरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ही स्पर्धा देखील अत्यंत महत्वाची आहे.