धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरुन हटवा
बीडमधील मूकमोर्चात एकमुखी मागणी
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-28 16:23:06
बीड :- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ( दि.२८ डिसेंबर ) बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या हत्येसंदर्भात काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर काही आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींना अटक करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली तसेच धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली.
या मोर्चात विविध पक्षाचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी मदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत धनंजय मुंडे हेच बीडचे पालकमंत्री होते. तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद वाल्मिक कराडला ते भाड्याने देण्यात आले होते. पालकमंत्र्यांचे सर्व अधिकार मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि प्रशासनावर आपली जरब बसवली.कराडे फोन करून सांगायचा की याला उचला. ३०७ मध्ये अडकवा, ३०२ मध्ये अडकवा, असे अनेक गुन्हे या परळीत दाखल आहेत.
पुढे बोलताना सोळंके यांनी वाल्मिक कराडला शक्ती देणारे धनजंय मुंडे मंत्रिमंडळात असल्याने संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असे वाटत नाही. म्हणूनच या घटनेचा निकाल लागेपर्यंत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत धनजंय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्या, ही बीडच्या जनतेची मागणी आहे सांगून यानंतरही जर आरोपींना अटक झाली नाही तर या देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाहीत”, असा इशाराही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला आहे.