प्राजक्ता माळी करणार महिला आयोगाकडे तक्रार
मनसे नेत्याचा आमदार सुरेश धस यांना इशारा
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-28 19:08:08
मुंबई : बीडमध्ये वाल्मिक कराड याच्याकडून होणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची माहिती देताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंधना यांचे नाव घेतले होते. त्यामुळे मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी संतापली आहे. प्राजक्ताने या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे समर्थन करताना आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक्सवर पोस्ट करत भाजप आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे. त्यानुसार, “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारे आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत, अशा शब्दांत खोपकर यांनी सुरेश धस यांना इशारा दिला आहे.
तर दुसरीकडे सगळं ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. पण माझी शांतता म्हणजे या सगळ्याला माझी मूक संमती नाहीये. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर ओढवलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्या दोन वाक्यांचे हजारो व्हिडीओ होतात. तेवढेच शब्द पकडले जातात. त्यावरून यूट्यूब चॅनल्सवर हजारो व्हिडीओ बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्यावर विधान करायला भाग पाडले जातं. मग समोरची व्यक्ती पुन्हा बोलते. ही चिखलफेक चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं”, अशा शब्दांत प्राजक्ता माळी हिने आपला संताप व्यक्त केला आहे.
एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात. महिलांच्या कर्तृत्वावरही तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. कुठल्याही राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवत आहात. ही खेदजनक बाब आहे”, असेही प्राजक्ता माळीने यावेळी नमूद केले.