वाल्मीकचा झाला 'वाल्या'
Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-30 11:40:06
एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला राजकीय वरदहस्त लाभला तर तो सर्व यंत्रणा कशाप्रकारे आपल्या हाती घेतो व प्रतिसरकार स्थापन करतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मीक कराड. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी पडेल ते काम करणारा हा वाल्मीक पुढे जाऊन धनंजय मुंडे यांची सर्व राजकीय सूत्रे हाती घेतो आणि अल्पावधीतच वाल्मीकचा 'वाल्या' बनला. ज्याप्रमाणे वाल्या कोळीच्या पत्नीने त्याच्या पापात सहभागी होण्यास नकार दिला, अशीच परिस्थिती आता या आधुनिक वाल्याची झाली आहे. ज्यांच्या वरदहस्ताने वाल्मीक कराडने बीड जिल्ह्यात आपली दहशत निर्माण केली तेच आता त्याला खुशाल गोळ्या घाला, अशी जाहीर बतावणी करत आपले अंग झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण बीड जिल्ह्यात दहशत पसरवून गुंडगिरी करणे इथपर्यंतच या वाल्मीकची मजल गेली नव्हती, तर पूर्ण शासकीय यंत्रणा त्याने आपल्या हाती घेतली होती. विधानसभेत मंत्र्यांनी याप्रकरणी मांडलेली कैफियत पाहता बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लावायची, हे सर्व ठरविण्याचे सर्वाधिकार या वाल्मीककडेच होते. एकप्रकारे त्याने बीड जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन केले होते व त्याचा तो स्वयंघोषित मुख्यमंत्री बनला होता. त्याचे हे कारनामे उघडकीस येण्यास मात्र सरपंच संतोष देशमुख यांना नाहक आपला जीव गमवावा लागला. कराडला वाल्मीकअण्णा म्हणून बीडमध्ये ओळखले जाते. मात्र, वाल्मीक कराडशिवाय धनंजय मुंडे यांचे पानदेखील हलत नाही, हे विधान स्वतः आमदार पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केले होते. गोपीनाथ मुंडे यांनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा, अशी कराडांची ओळख होती. पुढे जाऊन वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्यात घट्ट मैत्री झाली. धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून दूर झाले तेव्हा वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंसोबत आला. त्यानंतर धनंजय मुंडेंचे सर्व आर्थिक व्यवहार व राजकीय जबाबदारी वाल्मीक कराड पार पाडत होता. दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराड सांभाळत असे. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कराडकडेच जिल्ह्याची सूत्रे होती. वाल्मीक हा माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष, माजी गटनेता आहे. आज वाल्मीकवर 'धनंजय'हस्त नसता तर हाच गुंड पोलिसांच्या एन्काउंटरचा बळी ठरला असता. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. सरपंच देशमुख यांची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती. लायटरने त्यांचे डोळे जाळण्यात आले. जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्या. सरपंच देशमुख त्यांच्या आजोबांकडे मस्साजोगमध्ये लहानपणापासून राहत होते. पहिल्यांदा ते जनतेतून सरपंच झाले. त्यांच्या कार्यकाळात गावाला दीड कोटीचे बक्षीस मिळाले होते. बीडमध्ये अनुकूल वातावरण पाहता जिल्ह्यात अनेक पवनचक्क्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यातूनच येथे गुन्हेगारी वाढीला लागली. देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस आधी गावात दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या होत्या. मात्र, या प्रकरणात वाल्मीकच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनी कोणाचीही फिर्याद घेतली नाही. त्यानंतर पाटील नावाचे पोलीस अधिकारी आरोपींसोबत शनिवारी व रविवारी चहापाणी करत फिरत होते. संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतरही पोलिसांनी या घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यांची निर्घृण हत्या झाली तरी पोलीस आरोपींना साधे ताब्यात घेण्याचे सौजन्य दाखवत नव्हते. या सर्व घटनांमागे वाल्मीकची दहशत होती. बीडचा हा गुन्हेगारी पॅटर्न एकप्रकारे महाराष्ट्राची बिहारकडे सुरू असलेली वाटचालच म्हणावी लागेल. मात्र, उत्तर प्रदेश, बिहारसारख्या ठिकाणी आता पोलिसांचा वचक वाढून तेथे गुंडांना गोळ्या घातल्या जात आहेत. महाराष्ट्रात आता पूर्वीसारखे उत्तर प्रदेश, बिहारचा पोलीस व राजकीय पॅटर्न राबवला जात आहे. कारण येथील गुंडांना आता राजकीय संरक्षण मिळत असल्याने ते बिनधास्त फिरताना दिसत आहेत. बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली होऊन याठिकाणी नवीन अधिकारी आले असतानाही वाल्मीकपर्यंत त्यांचे हात पोहोचू शकले नाहीत. याला कारण म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या हाताखाली काम करणारी सर्व पोलीस यंत्रणा या वाल्मीकच्या कृपाछत्राखाली वावरत आहेत. विकासाच्या वाटेवर महाराष्ट्राला नेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महायुती सरकारला पहिल्यांदा बीडसारख्या राजकीय गुन्हेगारांचा बीमोड करावा लागेल. एकेकाळी याच महाराष्ट्रात सीबीआय, ईडी यांसारख्या यंत्रणांची दहशत होती. मात्र, सध्या या यंत्रणांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. खरं म्हणजे एखाद्या गुंडाची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे असते. त्याचे राजकीय लागेबांधे शोधले तर तो लागलीच हाती लागू शकतो. मात्र, गृहमंत्री डोळ्यावर पट्टी बांधून गुंडांना पकडण्याचे उसने अवसान आणत आहेत. आज एका राजकीय गुंडाला पकडण्यासाठी सर्वपक्षीयांना ते सत्तेत असो अथवा विरोधातील एकत्र येऊन मोर्चा काढावा लागत आहे. मात्र, महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री मिळाले असतानाही ते यावर काही बोलण्यास तयार नाहीत. विरोधी पक्ष व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वाल्मीक कुठे आहे, याची माहिती दिली असतानाही तो पोलिसांना सापडू शकत नाही. या प्रकरणातून अनेक खुलासे होताना दिसत आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षकांची भेट घेत महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यात नऊ अब्जाचे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. शंभर कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार असल्यास 'ईडी'कडून चौकशी होते. इथे नऊ अब्जाचे प्रकरण आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मलेशियापर्यंत पोहोचले आहेत. आकाचे असे उद्योग आता हळूहळू पुढे येऊ लागले आहेत, अशा शब्दांत आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांची कुंडलीच मांडली आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा 'मुंडेंच्या गुंडांचे बीड' अशी बीडची ओळख निर्माण होईल.