मस्साजोग प्रकरण दाबण्यासाठी प्राजक्ताचा वापर
सुषमा अंधारेंचा स्पष्ट आरोप
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-30 12:30:52
मुंबई :- भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी व अन्य महिला कलाकारासंदर्भात केलेल्या वक्तव्याने चांगलेच रणकंदन माजलेय. प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत थेट मुख्यमंत्र्याचे निवासस्थान गाठले आहे. प्राजक्ताच्या या आक्रमक पावित्र्यावर अनेकांनी तिला पाठिंबा, सहानुभूती दाखवली. मात्र शिवसेनेच्या( उद्धव ठाकरे ) सुषमा अंधारे यांनी ही राजकीय स्टंटबाजी सुरु असून मस्साजोग प्रकरणापासून लक्ष हटविण्यासाठी हे प्रकार सुरु असल्याचा आरोप केला आहे. प्राजक्ताचा वापर यासाठी केला जातोय असे अंधारे यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला काऊंटर करण्यासाठी प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद झाली. मोर्चाच्या चर्चा, त्यातील गंभीर मुद्दे, धनंजय मुंडे-वाल्मिक कराड हे विषय बाजूला सारण्याकरता पत्रकार परिषद घेतली गेली. संतोष देशमुख हत्या प्रकरण बाजूला करण्यासाठी जाणीवपूर्वक प्राजक्ता माळीचे प्रकरण पुढे आणायचं. हे का केले जाते?”, असा रोखठोक सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “फार शांतपणे आणि तटस्थपणे या सर्व प्रकाराकडे पाहण्याची गरज आहे. कारण मला असं वाटतं की पहिला मुद्दा सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेण्याची गरजच नव्हती. कारण तुमच्यावर ज्यांचा विश्वास असतो, ते स्पष्टीकरण मागत नाहीत आणि तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिले तरी शत्रू तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पृथ्वीचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असं म्हणून सोडून द्यायला हवे होते प्राजक्ता यांनी. याउपरही “प्राजक्ता यांना स्पष्टीकरण द्यायचंच होतं तर करुणा मुंडे यांनी खरं आक्षेपार्ह विधान केलं होते, तेव्हाच द्यायला हवे होते, पण तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं. आताही त्या दुर्लक्ष करू शकल्या असत्या. आता त्यांनी पत्रकार परिषद घेणे हा सगळा राजकीय फंडा मला वाटतो.
दरम्यान, इथल्या जातपितृसत्ताक व्यवस्थेत बाईचं कर्तृत्व शून्य केलं जातं. पण हे प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रीच्यावेळीच सुचते का? जेव्हा सुषमा अंधारेंविरोधात बोलले गेले तेव्हा का सुचलं नाही? सुरेश धस भाजपाचे आहेत. भाजपाची संस्था आरएसएस आहे. आरएसएसच्या मुख्यालयात प्राजक्ता जातात, तेव्हाच त्या कलाकार राहत नाही. त्यांचा राजकीय दृष्टीकोन तयार होतो”, असा स्पष्ट आणि थेट आरोपही अंधारे यांनी केला.